Ticker

6/recent/ticker-posts

सेवाग्राम उड्डाणपुलाखालील दिशादर्शक फलक तात्काळ दुरुस्त करावा – AIMIM ची मागणी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
वर्धा :-शहरातील सेवाग्राम उड्डाणपुलाखाली सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकावर सेवाग्राम, कस्तुरबा रुग्णालय, सेवाग्राम आश्रम तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे निवासस्थान असलेल्या बापूकुटीकडे जाणाऱ्या मार्गाची दिशा चुकीच्या पद्धतीने दर्शविण्यात आली आहे. सदर फलकावर दर्शविण्यात आलेली दिशा सरळ मार्गाऐवजी डाव्या बाजूस दाखविण्यात आल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात दिशाभूल होत आहे.
सेवाग्राम येथे असलेले कस्तुरबा रुग्णालय हे देशातील एक प्रमुख आणि महत्त्वाचे आरोग्य केंद्र असून येथे दूरदूरच्या भागांतून रुग्ण उपचारासाठी येतात. चुकीच्या दिशादर्शक फलकामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच सेवाग्राम आश्रमातील बापूकुटी हे ऐतिहासिक व राष्ट्रीय महत्त्वाचे स्थळ आहे. महात्मा गांधी यांच्या विचारांपासून प्रेरणा घेण्यासाठी भारतातील विविध राज्यांमधून तसेच परदेशातूनही मोठ्या संख्येने पर्यटक येथे भेट देतात. अशा परिस्थितीत चुकीची दिशा दर्शविणारा फलक पर्यटकांसाठीही मोठा संभ्रम निर्माण करणारा ठरत आहे.
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ठाम मागणी आहे की, सदर दिशादर्शक फलक तात्काळ दुरुस्त करून योग्य दिशानिर्देश दर्शविण्यात यावेत. अन्यथा AIMIM च्या वतीने या फलकावर उलटे लटकून एक अनोखे आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनातून उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभागाची राहील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या