शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे शैक्षणिक गुणवत्तेचा बोजवारा
रवि भोंगाने चित्रा न्युज
साकोली: जिल्हा परिषद शाळा सध्या एका गंभीर टप्प्यातून जात आहेत. एका बाजूला खाजगी शाळांच्या स्पर्धेत टिकून राहण्याचे आव्हान आहे तर दुसरीकडे स्वतःच्या शाळांमध्ये शिक्षकांचा अभाव असल्यामुळे मोठा तुटवडा आणि रिक्त पदाचा डोंगर आहे. यामुळे ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था डबघाईला आलेली आहे. साकोली तालुक्यात सध्या ४१ एक शिक्षकी आणि २१ दोन शिक्षकी शाळा असून शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे शैक्षणिक गुणवत्तेचा बोजवारा उडत असल्याचे दिसून येते. साकोली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शाळांची आणि शिक्षकांची आकडेवारी डोळ्यासमोर आणली तर एक दाहक वास्तव समोर येत आहे. एकीकडे खाजगी शाळांचे आव्हान शिक्षक वर्ग स्वीकारत असतांना शासनाच्या कर्म दारिद्र्य धोरणामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना माना खाली टाकाव्या लागत आहेत. अलीकडच्या काळात खाजगी शाळांना जिल्हा परिषदेच्या शाळांनी आपल्या गुणवत्तेच्या भरवशावर तगडे आव्हान दिले आहे. खाजगी शाळेतील विद्यार्थी आता जिल्हा परिषद शाळेकडे वळू लागले आहेत. याकरिता तन-मन धन ने जिल्हा परिषद शाळांचे शालेय प्रशासन मेहनत घेत आहेत. मात्र दुसरीकडे शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी असल्याने एक शिक्षकी शाळेतील विद्यमान शिक्षकांना त्यांचा त्रास होऊ लागलेला आहे. एक शिक्षकी शाळेत एका शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे की अभ्यासाव्यतिरिक्त शिक्षण विभागाने सोपविलेली कामे करावी हा प्रश्न त्यामुळे निर्माण झालेला आहे. ज्यात पोषण आहाराची नोंदणी, शालेय पोषण आहार वाटप, विविध शासकीय उपक्रम, विद्यार्थ्यांची हजेरी, पोर्टल वरील माहिती भरणे, सर्व्हे, निवडणूक, जनगणना या सारख्या इतर कामांचा समावेश आहे. या धावपळीत शिक्षकांचे मुख्य असलेले शिकविण्याचे काम मागे पडत आहे. एक शिक्षक एकाच वेळी चार वर्गाला हाताळणार कसा ? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पायाभूत ज्ञानावर मोठा परिणाम होत आहे. साकोली तालुक्यात सध्याच्या घटकेला एक शिक्षकी शाळा ४१ दोन शिक्षकी २१ शाळा मिळून एकूण १९४८ विद्यार्थी आहेत. जेव्हा एकाच शिक्षकावर शाळेच्या संपूर्ण जबाबदारीचा भार पडतो तेव्हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविक आहे. शिक्षकांचा अनुशेष आणि अतिरिक्त कामाचा भार यामुळे शाळेतील शैक्षणिक वातावरण विस्कळीत होत असते. दहापेक्षा कमी पट संख्या असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थितीही अनियमित असते. शिक्षक नसल्याने किंवा एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास खुंटत असतो. जिल्हा परिषद शाळा म्हणजे गरिबांच्या शिक्षणाचे मुख्य केंद्र आहे. परंतु तेच केंद्र सक्षम नसेल तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील रिक्त पदांचा प्रश्न सातत्याने चव्हाट्यावर येऊनही ठोस उपाययोजना होतांना दिसत नाही. भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ७९४ शाळा आहेत. यात जिल्ह्यात तब्बल २४१ शाळा एक शिक्षकी तर २३८ शाळांमध्ये दोन शिक्षकी आहेत. जिल्ह्यात एक शिक्षकी शाळांमध्ये १४,८५१ विद्यार्थी तर दोन शिक्षकी शाळांमध्ये ७९४ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. याचाच अर्थ असा की, एक शिक्षकी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.
_______________________________________________
खरं म्हणजे खाजगी शाळांपेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळा कुठेही कमी नाहीत. जिल्हा परिषदच्या गुणवत्तापूर्ण शाळा आणि गुणवंत शिक्षकांमुळे गुणी विद्यार्थी विद्यार्थिनी बाहेर पडत आहेत. परंतु झाले काय की, अलीकडच्या काळात शासनाच्या उरफाट्या धोरणामुळे शाळांकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. नवीन शिक्षकांची भरती प्रक्रिया संथ गतीने होत आहे. शाळेच्या इमारतीकडे दुर्लक्ष होत आहे. अपेक्षेपेक्षा पाहिजे तेवढ्या किमान सुविधा देण्यास शासन मागे पडत आहे. खाजगी शाळांच्या तुलनेत किमान साहित्य आणि भौतिक सुविधा जरी शाळांना पुरवल्या तरी जिल्हा परिषद शाळांची नंबर १ मध्ये गणना केली जाईल.
स्मिता सिडाम,
नगरसेवक साकोली.
_______________________________________________
जिल्हा परिषद शाळांकडे शासन दुर्लक्ष करून इंग्रजी शाळांना महत्त्व द्यायला लागले की काय असे वाटायला लागते. शासनाचे उदासीन धोरण याला संपूर्णपणे जबाबदार आहे. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षका अभावी पालक खासगी शाळांकडे वळतांना दिसतो. ग्रामीण भागात शिक्षणाविषयी उदासीनता आहे. जिथे कुठे शिक्षण महर्षीचे पीक उगवले आहे. यावर आळा घालण्यास सरकार समर्थ आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेचा काही गावातील वरचष्मा कमी होतांना दिसत आहे.
सुरेंद्र कोचे,
सेवानिवृत्त शिक्षक साकोली.


0 टिप्पण्या