चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :-हिंदू पंचांगात दर तीन वर्षांनी येणाऱ्या अतिरिक्त चंद्रमासाला “अधिक मास” असे म्हटले जाते. ग्रामीण भागात याला “धोंड्याचा महिना” असेही संबोधले जाते. भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने हा महिना आध्यात्मिक साधना व व्रतांसाठी अत्यंत पवित्र व फलदायी मानला जातो. सांसारिक धावपळीपासून दूर राहून आत्मचिंतन, संयम व निष्काम कर्म करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. श्री नथुजी राखडे महाराज यांनी केले.
अधिक मासाच्या पावन निमित्ताने योगभारतीच्या गुरूजनांच्या सत्कार कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. प्रमुख योग शिक्षक श्री शाम कुकडे यांनी अधिक मासातील एकादशी व्रतांचे विशेष धार्मिक महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, या महिन्यात अन्न, वस्त्र व ज्ञानदान करणे पुण्यकारक आहे. तसेच या काळात पूजापाठ, नदीस्नान, तीर्थदर्शन, ग्रंथपठण, प्रवचन श्रवण, मंत्रजप, ध्यान व दानधर्म असे शुभ कार्य करावे.
या प्रसंगी योग साधिका श्रीमती अर्चना मते यांनी प्रमुख योग साधक श्री शाम कुकडे, योगशिक्षक श्री चिंधुजी बुधे आदी गुरूजनांचा अन्न व वस्त्र देऊन सत्कार केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनिता देशमुख, चित्रा मोहतुरे, पुरुषोत्तम साकुरे आदींनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन पुरुषोत्तम समरीत यांनी केले तर आभार प्रदर्शन पुरुषोत्तम वैद्य यांनी मानले.
या निमित्ताने योग भारती बहुउद्देशीय संस्थेचे योग साधक — शाम कुकडे (प्रमुख योगशिक्षक), चिंधुजी बुधे, के. झेड. शेंडे, मधु गभने, अरुण गावंडे, राखडे महाराज, राजेंद्र देशमुख, प्रभाकर तितीरमारे, पुरुषोत्तम साकुरे, राजकुमार कृपाण आदींनी वैनगंगा नदी (गणेशपूर घाट) येथे स्नान करून पूजा-अर्चना केली.


0 टिप्पण्या