Ticker

6/recent/ticker-posts

साकोली राष्ट्रीय महामार्गावरील १० कि. मी. परिसर आता सीसीटीव्ही कॅमेरा निगराणीत

परिसरावर नजर ठेवणार सीसीटीव्ही कॅमेरा रुपातील तिसरा डोळा 

रवि भोंगाने चित्रा न्युज 
 साकोली:- कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याकरिता पोलीस विभागाकडून कठोर पाऊल उचलण्यात आलेली आहेत. त्यामुळे साकोली राष्ट्रीय महामार्गावरील १० कि.मी. परिसर आता सीसीटीव्ही कॅमेरा निगराणीत असणार आहे. आजच्या घटकेला ११५ सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे सहकार्य लाभणार असून परिणामी गुन्हेगारांवर, स्टंटबाजी करणाऱ्यावर, कायदा आणि सुव्यवस्था विषयी बेजबाबदार असणाऱ्यावर लगाम लागणार आहे. यातून पोलिसांनाही भक्कम पुरावे मिळणार आहेत. सविस्तर माहिती अशी की, साकोली येथे कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पोलीस विभागाने महत्त्वपूर्ण आणि महत्त्वकांक्षी पाऊल उचललेली आहेत. शहराच्या सुरक्षिततेसाठी एकूण ११५ अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे विणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झालेले आहे. या उपक्रमामुळे गुन्हेगारावर वचक बसणार असून शहरातील संवेदनशील भागांवर २४ तास तिसऱ्या डोळ्याचा वॉच राहणार आहे. शहरात वाढणाऱ्या चोरीच्या घटना, खंडणीचे प्रकार, रस्ते अपघात आणि इतर अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. साकोली शहराचा विस्तार आणि त्यासोबत वाढणाऱ्या समस्या बघता सुरक्षा तंत्रज्ञान अद्यावत करणे काळाची गरज बनलेली होती. ही गंभीर बाब लक्षात घेऊन वीरसी फाट्यापासून ते जांभळी ( सडक ) फाट्यापर्यंतचा सुमारे १० कि. मी. चा संपूर्ण महामार्ग आता सीसीटीव्हीच्या कक्षेत येणार आहे. यामुळे महामार्गावरील प्रवाशांची सुरक्षा वाढविण्यास मोठी मदत होणार आहे. या सुरक्षा यंत्रणेमध्ये १० हाय क्वालिटी कॅमेरे आणि ३६०° फिरणारे १०५ अत्याधुनिक ४ के दर्जाचे कॅमेरे बसविण्यात येत आहेत. शहरातील मुख्य चौक, रहदारीची प्रमुख ठिकाणे आणि महामार्गावरील अति संवेदनशील अशी एकूण ३५ महत्वाची ठिकाणे निवडून तिथे हे कॅमेरे तैनात केली जाणार आहेत. ही यंत्रणा २४ तास कार्यरत राहणार असून कोणत्याही संशयाबाबत हालचालीवर पोलिसांचे त्वरित लक्ष जाणार आहे. शहरातील रस्त्यांवर होणाऱ्या बाईक्स स्टंटबाजीला आळा घालण्यासाठी ही यंत्रणा आता अत्यंत प्रभावी ठरणार आहे. हिरोगिरी करून बेशिस्त वाहन चालविणाऱ्या  तरुणांवर कारवाई करणे आता सोपे होणार आहे. या व्यतिरिक्त शहरातील रॅली, मोर्चे आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांच्या वेळी कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाल्यास या कॅमेऱ्याच्या मदतीने अचूक आणि पारदर्शी लक्ष ठेवणे पोलिसांना शक्य होणार आहे. शहराला एकूण २२५ कॅमेराची गरज असली तरी सध्या सुरक्षितेच्या प्राधान्य क्रमानुसार पहिल्या टप्प्यात ११५ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. भविष्यात उर्वरित कॅमेरे बसवून संपूर्ण शहर सुरक्षा कवचामध्ये आणण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमामुळे साकोली शहर अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध होण्यास मदत होईल. नागरिकांमध्ये सुरक्षा आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. पोलिसांची ही सतर्कता गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांसाठी एक मोठा इशारा आहे. या सीसीटीव्ही कॅमेरातून गुन्हेगारांविषयी पोलिसांना भक्कम पुरावे मिळणार असून गुन्हेगारांच्या हालचालीवर केवळ लक्ष ठेवणे नव्हे तर गुन्ह्याच्या तपासामध्ये या कॅमेराची भूमिका अत्यंत महत्त्वाची अणि प्रभावशाली ठरणार आहे. अनेकदा गुन्ह्याचा तपास करतांना ठोस पुराव्याअभावी अडचणी येतात. आता मात्र या कॅमेऱ्यांमुळे पोलिसांना न्यायालयात सादर करण्यासाठी लागणारे ठोस पुरावे सहज उपलब्ध होणार आहेत. 
_______________________________________________
 
साकोली परिसरात पोलीस विभागाकडून सीसीटीव्ही कॅमेरे लागत असल्याने सर्वप्रथम पोलीस विभागाचे अभिनंदन. सुरक्षा आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हे प्रगतिशील पाऊल पोलीस विभागाने उचललेले आहे. परिणामी शहरात वाढणाऱ्या वाईट प्रवृत्ती नियंत्रणात येणार आहेत. रात्री बे रात्री फिरणाऱ्या आणि चुकीचे काम करणाऱ्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या रूपात हा तिसरा डोळा २४ तास कार्यरत असणार आहे. त्यामुळे नागरिकांना आवाहन करते की, त्यांनी स्वतः च्या चुकीच्या कर्मांना आवर घालावा. अन्यथा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या तिसरा डोळा आपल्या कोणत्याही गैरकृत्याला वाचवू शकणार नाही.

 देवश्री मनिष कापगते.
 नगराध्यक्ष,
 साकोली-सेंदुरवाफा नगरपरिषद ______________________________________________

साकोलीत चालणाऱ्या अवैध प्रकारांना या सीसीटीव्ही कॅमेरामुळे वचक बसणार आहे. तालुक्यातील सुरक्षेतेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाने ही पाऊले उचललेली आहेत. साकोली-सेंदूरवाफा शहराच्या दृष्टिकोनातून ही नवीन सुरुवात आहे. त्यामुळे गैकृत्य करणाऱ्यांनी आता तरी सावध राहावे. साकोली तालुक्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी जेवढे उत्तम  कार्य करता येईल त्याकरिता आमचे पोलीस प्रशासन सदैव तत्पर आहे. 

महादेव आचरेकर.
पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन साकोली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या