चित्रा न्युज प्रतिनिधी
यवतमाळ :-शेंबाळ पिंपरी येथे प्रस्तावित उप्पर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात बेलोरा महसूल मंडळाचा समावेश करण्याच्या प्रस्तावास बेलोरा येथील प्रतिष्ठित नागरिक तथा आजाद समाज पार्टी (कां.) युवा जिल्हाध्यक्ष, यवतमाळ राजकुमार भगत यांनी हरकत नोंदवत उपविभागीय अधिकारी, पुसद यांना वैयक्तिक निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बेलोरा महसूल मंडळातून शेंबाळ पिंपरी हे सुमारे ४६ कि.मी. अंतरावर असून, या मार्गावर कोणतीही नियमित एस.टी. बस अथवा सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध नाही. तसेच या मार्गावरील रस्त्यांची अवस्थाही समाधानकारक नसल्याने शेतकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कामांसाठी मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
याउलट बेलोरा ते पुसद हे केवळ ३६ कि.मी. अंतरावर असून या मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) बससह इतर सार्वजनिक वाहतूक सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे बेलोरा महसूल मंडळातील नागरिकांचे महसूल, बँकिंग, आरोग्य, शिक्षण, बाजारपेठ तसेच इतर शासकीय कामकाज अनेक वर्षांपासून पुसद शहराशीच निगडित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, उप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्यामागील शासनाचा उद्देश नागरिकांना अधिक सुलभ, जलद व परिणामकारक महसूल सेवा उपलब्ध करून देणे हा आहे. मात्र बेलोरा महसूल मंडळाचा शेंबाळ पिंपरी कार्यक्षेत्रात समावेश केल्यास नागरिकांना अधिक अंतर, वाहतुकीचा अभाव आणि खराब रस्त्यांमुळे अनावश्यक आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे शासनाच्या मूळ उद्देशालाच बाधा निर्माण होईल.
त्यामुळे बेलोरा महसूल मंडळाचा शेंबाळ पिंपरी उप्पर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समावेश न करता तो पूर्ववत पुसद तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातच कायम ठेवण्यात यावा, अशी मागणी राजकुमार भगत यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात प्रशासनाने स्थानिक नागरिकांच्या भावना, भौगोलिक परिस्थिती, सार्वजनिक वाहतूक सुविधा, रस्त्यांची अवस्था आणि जनहित यांचा सखोल विचार करून न्याय्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही बेलोरा येथील प्रतिष्ठित नागरिक तथा आजाद समाज पार्टी (कां.) युवा जिल्हाध्यक्ष, यवतमाळ राजकुमार भगत यांनी व्यक्त केली.


0 टिप्पण्या