पुरोगामी लेखक,संशोधक, समीक्षक पद्मश्री डॉ.गंगाधर पानतावणे यांच्या दि.२८ जून २०२६ रोजी असलेल्या ८९ व्या जयंती निमित्त साहित्यिक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांनी शब्दबद्ध केलेला लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.
पद्मश्री डॉ.गंगाधर पानतावणे
एक थोर पुरोगामी साहित्यिक
दलित साहित्य चळवळीचे प्रमुख भाष्यकार, लेखक,संशोधक,आंबेडकरी साहित्याचे एक आग्रगण्य विचारवंत,प्रख्यात आंबेडकरवादी साहित्यिक,एक थोर पुरोगामी साहित्यिक, समीक्षक पद्मश्री डॉ.गंगाधर पानतावणे यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ॥
पद्मश्री डॉ.गंगाधर विठोबाजी पानतावणे यांचा जन्म दि.२८ जून १९३७ रोजी नागपूर येथे एका गरीब कुटुंबात झाला.त्यांचे वडील विठोबाजी गिरणी कामगार होते आणि ते शिवराम जानबा कांबळे यांच्या सामाजिक चळवळीशी जोडलेले होते.गरिबीमुळे त्यांना काही काळ शाळा सोडावी लागली,त्यांनी दिवसा मजुरी करून रात्रीच्या शाळेतूनही शिक्षण पूर्ण केले.डी.सी.मिशन स्कूल येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले,तर नवयुग विद्यालय आणि पटवर्धन हायस्कूल नागपूर येथे माध्यमिक शिक्षण झाले. सन - १९५६ या वर्षी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नागपूरच्या मॅरीस महाविद्यालयातून त्यांनी बी.ए.आणि एम.ए.ची पदवी मिळवली.मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी पीएच. डी. ची पदवीही मिळवली.
महाविद्यालयीन काळात त्यांच्यावर थोर कवी शरच्चंद्र मुक्तिबोध आणि वि.भि.कोलते यांचा मोठा प्रभाव पडला होता .१९८७ मध्ये त्यांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता' या विषयावर मौल्यवान संशोधन करून पीएच.डी. पदवी मिळविली होती. १९६२ मध्ये ते छत्रपती संभाजीनगर येथील मिलिंद महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
पुढे त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. १९९७ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.डॉ.गंगाधर पानतावणे हे खऱ्या अर्थाने 'आंबेडकरी चळवळीचा ज्ञानकोश' म्हणून ओळखले जातात.त्यांनी दलित - आंबेडकरी साहित्याला वैचारिक दिशा व प्रतिष्ठा मिळवून देण्याचे अत्यंत मोलाचे कार्य केले.त्यांनी सुरू केलेले 'अस्मितादर्श' हे नियतकालिक दलित साहित्य चळवळीचे मुख्य वैचारिक विद्यापीठ ठरले.
'अस्मितादर्श'च्या माध्यमातून त्यांनी लेखक आणि समीक्षकांची एक संपूर्ण पिढी घडविली.ते एक अत्यंत प्रभावशाली वक्ते होते,त्यांचीअभ्यासपूर्ण व्याख्याने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असत.२००९ मध्ये अमेरिकेतील सॅन होजे येथे भरलेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.त्यांच्या अभूतपूर्व साहित्यिक आणि सामाजिक योगदानासाठी भारत सरकारने त्यांना २०१८ मध्ये 'पद्मश्री' हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला. त्यांनी स्वतंत्र वैचारिक व समीक्षणात्मक ग्रंथांचे लेखन केले.अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांचे संपादनही केले आहे. त्यांनी मूल्यवेध (१९७२),विद्रोहाचे पाणी पेटले आहे, (१९७६), दलितांचे प्रबोधन (१९७८), प्रबोधनाच्या दिशा (१९८४), पत्रकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर (१९८७),वादळाचे वंशज,साहित्य : प्रकृती आणि प्रवृत्ती (१९९९),साहित्य निर्मिती : चर्चा आणि चिकित्सा साहित्य शोध आणि संवाद (२००२),आंबेडकरी जाणिवांची आत्मप्रत्ययी कविता (२०१०) तसेच त्यांनी चरित्र आणि व्यक्तिचित्रनात्मक लेखनही केले जसे : मूकनायक (१९७८) ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्रलेणी (१९९७), स्मृतिशेष (२००२),त्यांनी काही ग्रथ संपादित केले उदा. धम्मचर्चा (१९६३),दलित कथा (१९८०), विचारयुगाचे प्रणेते : डॉ.बाबासाहेब आंबेडकर (१९८१),दलित आत्मकथन (१९८५),महारांचा सांस्कृतिक इतिहास (१९८६),लोकरंग (१९८७),दलित साहित्य : चर्चा आणि चिंतन (१९९४),स्त्री आत्मकथन(१९९०),लोकचळवळीचे प्रणेते : म.जोतीराव फुले (१९९६),डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवडक लेख (१९९७) इत्यादी ग्रंथाचे संपादन केले.पद्मश्री डॉ.गंगाधर पानतावणे यांनी १९६८ मध्ये 'अस्मितादर्श' या त्रैमासिकाची (नियतकालिक) सुरुवात केली.हजारो वर्षांपासून उपेक्षित आणि शोषित राहिलेल्या समाजाच्या वेदना, त्यांचे अनुभव आणि त्यांच्या अस्मितेला हक्काचा विचारमंच मिळवून देणे हा या मासिकाचा त्यांचा मुख्य उद्देश होता. दलित साहित्याचे मुखपत्र 'अस्मितादर्श'हे दलित साहित्य चळवळीचे अधिकृत मुखपत्र मानले जाते.पारंपारिक मराठी साहित्यात ज्या घटकांना स्थान नव्हते, त्या उपेक्षित घटकांच्या जगण्याचे वास्तव आणि संघर्ष या नियतकालिकाने प्रभावीपणे समाजासमोर आणले. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी या मासिकाचा गौरव "दलित साहित्याचा पाया" असा केला होता.अस्मितादर्श मासिक म्हणजे नव्या लेखकांची 'प्रयोगशाळा' होती डॉ.गंगाधर पानतावणे यांनी या मासिकाच्या माध्यमातून शेकडो तरुण दलित,विद्रोही, अंबेडकरवादी कवी-लेखक आणि विचारवंतांना लिहिते केले आणि त्यांना मार्गदर्शन केले.नामदेव ढसाळ, दया पवार,राजा ढाले,बाबुराव बागूल अशा अनेक ख्यातनाम साहित्यिकांच्या लेखनाला आणि विचारांना 'अस्मितादर्श'मुळे मोठी चालना मिळाली;म्हणूनच या नियतकालिकाला "लेखक निर्मितीची प्रयोगशाळा" देखील म्हटले जाते. डॉ.गंगाधर पानतावणे यांनी तब्बल ५० वर्षे (अर्धशतक) या नियतकालिकाचे संपादन अत्यंत निष्ठेने आणि एकहाती सांभाळले.वर्गणीदार गोळा करणे,लेख मिळवणे,त्यांचे संपादन करणे,मुद्रित शोधन (प्रूफ रीडिंग) करणे आणि स्वतः पोस्टात जाऊन अंक टाकणे, ही सर्व कामे ते स्वतः करायचे. कोणत्याही व्यावसायिक जाहिरातींशिवाय केवळ सामाजिक बांधिलकीतून त्यांनी हे मासिक अविरतपणे चालविले.केवळ मासिकापुरते मर्यादित न राहता, त्यांनी 'अस्मितादर्श साहित्य संमेलने' भरवण्यास सुरुवात केली. या संमेलनांच्या माध्यमातून वैचारिक मंथन घडवून आणत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आणि ग्रामीण भागात परिवर्तनाची एक नवी पुरोगामी चळवळ उभी केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीवर आधारित असलेल्या 'अस्मितादर्श' मासिकाने मराठी साहित्यातील उच्चवर्णीय मक्तेदारी मोडून काढली आणि साहित्याला 'विद्रोहाचे' व 'मानवी मूल्यांचे' नवे परिमाण मिळवून दिले. दि.२७ मार्च २०१८ रोजी वयाच्या ८० व्या वर्षी छत्रपती संभाजीनगर येथे थोर पुरोगामी विचारवंत डॉ .गंगाधर पानतावणे अनंतात विलिन झाले.दि.२८ जून २०२६ ला असलेल्या त्यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ॥
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
साहित्यरत्न पुरस्कार प्राप्त
साहित्यिक
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
अमरावती .८०८७७४८६०९.


0 टिप्पण्या