रोखठोक : रवि भोंगाने
नवे शैक्षणिक धोरण म्हणजेच शाळा महाविद्यालय सुरू झाल्यानंतर देशभरातील शाळांना वृक्षारोपणाचे काम करावे लागणार आहे. आता म्हणे प्रत्येक शाळांना ५० झाडे लावून शाळासह हिरवागार परिसर करावा लागणार आहे. ' नेमेची येतो पावसाळा ' या म्हणीप्रमाणे " नेमेची येतो वृक्षारोपण " ही म्हण नव्याने तयार झाली. वृक्षारोपणाचा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी दरवर्षी ठरलेला असतो. मग प्रत्येक वर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम होत असेल तर ही झाडे जातात कुठे ? दरवर्षीचे शासनाचे ठरलेले धोरण यशस्वी का होत नाही ? प्रश्न महत्त्वाचा हा आहे की, एखादे धोरण, एखादे उद्दिष्ट यशस्वी करायचे असेल, साध्य करायचे असेल तर त्याकरिता आधी जबाबदारी घ्यावी लागेल. ती जबाबदारी पूर्णपणे तण मनाने स्वीकारावी लागेल. परंतू यात खरी गोम ही आहे की जबाबदारी घ्यायला कोणीच तयार नाही. केवळ फक्त केवळ सोपस्कार पार पाडले जातात, फार्मलिटीज केली जाते. सोपस्कार आणि जबाबदारी यात फार मोठी दरी आहे. या दरीमध्ये उडी मारायला कोणीच तयार होत नाही हे आधी लक्षात घेणे आवश्यक आहे. प्रत्येक शाळेला ५० झाडे लावावी लागणार आहेत, पण कुठे ? शाळेत जागाच नाही तर लावायची तरी कुठे ? बरं ज्या शाळेमध्ये जागा आहे तिथे झाडे लावली तर शाळेच्या मैदानावर सुट्टीच्या दिवशी मुले क्रिकेट खेळतात. तो क्रिकेटचा चेंडू त्या झाडांची ऐसी तैसी करतो. मग झाडे जगणार तरी कशी ? दुसरा प्रश्न शाळा परिसरात जागा नसेल तर गावातील परिसरात झाडे लावा असे शिक्षण अधिकाऱ्यांच्या पत्रात नमूद आहे. चला मान्य करू या की एक वेळ झाडे लावली पण त्यांची देखरेख करायची कुणी ? जनावरांपासून ती झाडे वाचवायची जबाबदारी घ्यायची कुणी ? पावसाळा संपल्यानंतर वेळोवेळी झाडांना पाणी टाकायचे कुणी ? किमान ५ वर्षापर्यंत त्या झाडांचे घरच्या लेकरा बाळासारखे संगोपन करायची जबाबदारी घ्यावी कुणी ? या प्रश्नाची उत्तरे जर कुणाकडे नसतील तर धोरण हे धरणातच जाईल त्या पलीकडे काय होणार आहे ? पुन्हा पुढील वर्षी तोच तमाशा, हेच नाटक आणि तेच कीर्तन... आणखी काय ? किमान ५ वर्षापर्यंत झाडे जतन करायची धमक जर नसेल तर फार्मलिटीज करायच्या तरी कशाला ? नमो सरकारच्या सुरुवातीच्या काळात ५० लाखांच्या झाडाचे उद्दिष्ट होते काय झालं ? सामाजिक वनीकरणाने आपल्या स्वतःच्या रोपवाटीकेवर करोडो रुपये खर्च केले आणि त्याचा आपण वृक्षारोपणाच्या निमित्ताने सत्यानास केला ? किती झाडे लावली आणि किती झाडे आतापर्यंत जगली याचा गोषवारा आहे कुणाकडे असेल तर दाखवावा ? काही वर्षांपूर्वी प्रत्येक गावात, गावातील परिसरात आणि गावाच्या वेशीवर झाडे लावण्यासाठी खड्डे खोदण्यात आले. तिथे झाडे लावण्यात आली. त्या झाडाभोवती कुंपण करण्यात आले. दोन महिन्यानंतर ना कुंपणे दिसली ना झाडे दिसली ना झाडासाठी खोदलेले खड्डे. या निमित्ताने आम्ही सर्वांनी सामाजिक वनीकरण विभागाने लाखो करोडो रुपये खर्च करून आपल्या रोपवाटिकेत तयार केलेल्या लाखो रोपट्यांची आम्ही मात्र वाट लावली. त्याचे कुणालाच कसे काही वाटले नाही. कारण मुळातच या प्रकरणात आम्ही असंवेदनशीलमध्ये मोडतो. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणीय समस्या बाबत संवेदनशीलता निर्माण करणे, त्यांच्यात पर्यावरणाबाबत जबाबदार वृत्ती आणि वर्तन रुजवण्याचा उद्देश असे पत्रकात म्हटले आहे. मग झाडांच्या बाबतीतली आमची संवेदशीलता कुठे जाते ? आमची जबाबदारी कुठे गेली ? आमचे वर्तन कुठे गेलं ? आम्हीच संवेदनशीलता दाखवीत नाही, आम्हीच बेजबाबदारीने वागतो, आमचे वर्तन आम्हालाच माहीत नाही तर हा तमाशा, हे नाटक आणि कीर्तन करायचीच कशाला ? यापूर्वी गेल्या कित्येक वर्षापासून शाळा महाविद्यालयात, शासकीय निम शासकीय कार्यालयात, गावागावात, रस्त्या रस्त्यावर लावत आलेली ( लावलेली) झाडे गेली कुठे ? खरंच याबाबतीत आम्ही संवेदनशील आहोत काय ?याचे आत्मचिंतन आता प्रत्येकानेच करावे नव्हे करावेच लागणार आहे. धोरणाविषयी प्रत्येक जबाबदार व्यक्तीने, गावातील पदाधिकाऱ्याने, अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी स्वतःची संवेदशीलता दाखवून जर जबाबदारी स्वीकारली तरच हे धोरण साध्य होईल अन्यथा हे धोरण धरणात डुबल्या शिवाय राहणार नाही.


0 टिप्पण्या