महात्मा संत कबीर यांच्या ज्येष्ठ पौर्णिमेला असलेल्या जयंतीनिमित्त साहित्यिक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.
महात्मा कबीर एक क्रांतिकारी
विचारवंत व युगप्रवर्तक संत
संत कबीरांना । आज जन्मदिनी ।
वंदन करांनी । कोटी कोटी ॥
एक अढळ प्रकाशस्तंभ, क्रांतिकारी विचारवंत व युगप्रवर्तक संत,मानवी जीवनाचे सार सांगणारे मानवतावादी संत, शब्दांतून समाजप्रबोधन व समाजसुधारणा करणारे संत, समतेचा आणि बंधुभावाचा संदेश देणारे संत,कुप्रथांवर प्रहार करणारे महात्मा संत कबीर यांना ज्येष्ठ पौर्णिमेला असलेल्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ॥
संत कबीर हे १५ व्या शतकातील प्रसिद्ध भारतीय संत होते.त्यांच्या जन्माविषयी इतिहासकार आणि लोकमान्यतेमध्ये विविध कथा प्रसिद्ध आहेत.त्यांच्या जन्माची नेमकी तारीख किंवा निश्चित माहिती उपलब्ध नसली,तरी त्यांचे बालपण आणि संगोपन याभोवती दोन मुख्य विचारप्रवाह आढळून येतात.
लोककथा आणि पौराणिक मान्यता अशी आहे की,अनेक लोकमान्यतेनुसार,संत कबीर यांचा जन्म सर्वसामान्य बालकांसारखा झाला नव्हता. इसवी सन -१३९८ किंवा काही इतिहासकारांच्या मते १४४० मध्ये ज्येष्ठ पूर्णिमेच्या दिवशी, काशी (वाराणसी) येथील लहरतारा नावाच्या तलावात एका मोठ्या कमळाच्या फुलावर ते लहान बालकाच्या रूपात प्रकट झाले.यावेळी तिथे उपस्थित असलेल्या अष्टानंद ऋषींनी हा दिव्य प्रसंग पाहिला होता,अशी मान्यता कबीर पंथात मानली जाते.
दुसऱ्या एका सामाजिक कथेनुसार,काशीमधील एका गरीब विधवा ब्राह्मण स्त्रीच्या पोटी संत कबीरांचा जन्म झाला होता.परंतु तत्कालीन सामाजिक परिस्थिती आणि लोकलाजेच्या भयास्तव तिने त्या नवजात बालकाला लहरतारा तलावाच्या कडेला सोडून दिले.त्या तलावावरून जात असलेल्या नीरू आणि नीमा नावाच्या एका गरीब मुस्लिम विणकर (जुलाहा) दांपत्याला ते लहान मूल रडताना सापडले. ते अपत्यहीन असल्यामुळे त्यांनी देवाची कृपा समजून त्या बालकाला घरी आणले आणि त्याचे नाव 'कबीर' (ज्याचा अर्थ 'महान' किंवा 'सर्वोच्च' असा होतो) ठेवून त्याचा अत्यंत प्रेमाने सांभाळ केला.विणकर
म्हणूनच कबीरांनी आपले जीवन व्यतीत केले.हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही संस्कृतींचा त्यांच्या जन्माशी व संगोपनाशी आलेला हा संबंध पुढे त्यांच्या धर्मनिरपेक्ष आणि मानवतावादी विचारांचा पाया ठरला. हे त्यांच्या अनेक दोह्यातून दिसून येते.ते काशीमधील थोर संत रामानंद यांचे शिष्य मानले जातात. संत कबीरांनी कोणत्याही औपचारिक शालेय शिक्षणाशिवाय ज्ञान संपादन केले. त्यांचे विचार मानवी समता आणि बंधुभावावर आधारित होते.त्यांनी समाजातील जात-पात आणि भेदभावाचा तीव्र निषेध केला.कबीर हे निर्गुण ईश्वराचे उपासक होते.ईश्वर प्रत्येक माणसाच्या हृदयात वास करतो,असे ते मानत.त्यांनी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मांतील अंधश्रद्धांवर प्रहार केला.संत कबीरांनी मूर्तीपूजा,कर्मकांड आणि बाह्य अवडंबरांना कडाडून विरोध केला.मंदिरात किंवा मशिदीत नव्हे,तर माणसात देव शोधावा,अशी त्यांची शिकवण होती.त्यांनी समाजातील अनिष्ट रूढी-परंपरा बंद करण्याचा प्रयत्न केला.कबीर हे सर्व धर्मांचे ऐक्य साधणारे क्रांतिकारी समाजसुधारक
होते.त्यांच्या मते,सर्व मानव एकाच ईश्वराची लेकरे आहेत.त्यांनी लोकांना नेहमी सत्याच्या मार्गावर चालण्याचा संदेश दिला. संत कबीरांनी अहिंसा आणि प्रेमाच्या संदेशाचा जगभर प्रसार व प्रचार केला.श्रीमंत-गरीब असा भेद न करता त्यांनी सर्वांना समान मानले.त्यांचे जीवन अत्यंत साधे आणि उच्च विचारसरणीचे प्रतीक होते.
संत कबीरांची मुख्य रचना 'बीजक' या नावाने प्रसिद्ध आहे.त्यांच्या काव्यात 'साखी', 'शबद' आणि 'रमैनी' यांचा समावेश होतो. यापैकी 'बीजक' हा संत कबीरांच्या अनुयायांचा आणि कबीर पंथाचा सर्वात मुख्य आणि पवित्र ग्रंथ मानला जातो.'बीजक' म्हणजे गुप्त धन किंवा मूळ सत्याचा पत्ता सांगणारा दस्तऐवज.यात कबीरांच्या मुख्य रचना संकलित केल्या आहेत.याचे साखी,शबद आणि रमैनी असे विविध भाग पडतात.साखी हा शब्द 'साक्षी' (Witness) या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ 'प्रत्यक्ष पाहिलेले सत्य' असा होतो. 'साखी' या रचना मुख्यतः 'दोहा' छंदात लिहिलेल्या आहेत. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कबीरांनी त्यांचे व्यावहारिक ज्ञान,अनुभव,नीतीमत्ता आणि अध्यात्माचे ज्ञान अत्यंत सोप्या भाषेत मांडलेले आहे.'शबद' (पद)'शबद' म्हणजे कबीरांनी गायलेली पदे(भजने). ही पदे गेय (गाण्यायोग्य) आणि संगीतमय आहेत. 'रमैनी' म्हणजे ज्यामध्ये रममाण व्हावे अशा चौपाया.या रचना प्रामुख्याने 'चौपाई' छंदात असून त्यांच्या शेवटी दोहे जोडलेले असतात.यामध्ये कबीरांचे तत्त्वज्ञान, विश्वाची निर्मिती आणि धार्मिक विचारांचे सखोल विवेचन पाहायला मिळते.दोहा हा दोन ओळींचा अत्यंत छोटा आणि प्रभावी छंद आहे.केवळ दोन ओळींमध्ये मानवी जीवन, सदाचार,अहंकारमुक्ती आणि सामाजिक विषमतेवर कबीरांनी थेट बोट ठेवले आहे.कबीरांचे दोहे आजही जगभर अत्यंत लोकप्रिय आहेत.कबीरांचे 'दोहे' (दोन ओळींचे छंद) आजही खूप लोकप्रिय आहेत.त्यांच्या दोह्यांमध्ये अत्यंत सोप्या भाषेत जीवनाचे मोठे तत्त्वज्ञान सांगितले आहे.संत कबीरांच्या रचनांमध्ये मुख्यत्वे 'सधुक्कडी' किंवा 'अवधी' भाषा आढळते.त्यांच्या रचनांमध्ये राजस्थानी,हरियाणवी,पंजाबी,हिंदी आणि भोजपुरी या भाषांचे मिश्रण देखील पाहायला मिळते.(ज्याला सधुक्कडी किंवा पंचमेल खिचडी म्हटले जाते).शिखांच्या पवित्र 'गुरु ग्रंथ साहिब' या ग्रंथातही कबीरांच्या अनेक पदांचा समावेश आहे.त्यांचे विचार आजही आधुनिक समाजाला दिशा दाखवणारे आहेत. कबीरांचे अनुयायी 'कबीरपंथी' म्हणून ओळखले जातात.संत कबीर हे भारतीय इतिहासातील एक अजरामर आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व आहेत.
जातीयता आणि भेदाभेदावर प्रहार करताना संत कबीर खालील दोह्यात म्हणतात की,
जाति न पूछो साधु की,
पूछ लीजिये ज्ञान।
मोल करो तरवार का,
पड़ा रहन दो म्यान।।
म्हणजे कोणत्याही साधुची - सुजाण किंवा सज्जन व्यक्तीची जात विचारू नका, तर त्याच्याकडे असलेल्या ज्ञानाचा आदर करा आणि ते ग्रहण करा. आपण नेहमी तलवारीचे मूल्य करतो,ती ज्या म्यानात ठेवली आहे त्याचे नाही,तसेच माणसाचे महत्त्व त्याच्या गुणांवरून ठरते, जातीवरून नाही.
स्वतःमधील दोष सुधारण्याचा संदेश खालील दोह्यात देताना म्हणतात की,
बुरा जो देखन मैं चला,
बुरा न मिलिया कोय।
जो दिल खोजा आपना,
मुझसे बुरा न कोय।।
कबीरदास म्हणतात की, जेव्हा मी जगात वाईट गोष्टी किंवा वाईट माणसे शोधायला निघालो, तेव्हा मला कोणीही वाईट आढळले नाही. पण जेव्हा मी स्वतःच्या अंत:करणात डोकावून पाहिले, तेव्हा मला समजले की, माझ्यापेक्षा वाईट किंवा दोष असलेला दुसरा कोणीच नाही. म्हणजेच इतरांवर टीका करण्यापूर्वी माणसाने स्वतःचे आत्मपरीक्षण केले पाहिजे.
टीकाकारांचे महत्त्व सांगताना ते म्हणतात की,
निंदक नियरे राखिए,
ऑंगन कुटी छवाय।
बिन पानी, साबुन बिना,
निर्मल करे सुभाय।।
आपल्यावर टीका करणाऱ्या किंवा आपल्या चुका काढणाऱ्या लोकांना आपण नेहमी आपल्या जवळ ठेवले पाहिजे. कारण असे लोक पाणी आणि साबणाशिवाय आपल्या चुका दाखवून देऊन आपला स्वभाव आणि चारित्र्य स्वच्छ व निर्मळ बनवण्यास मदत करतात.
संत कबीर ढोंगी धार्मिकतेवर आणि अंधश्रद्धेवर आसूड ओढताना म्हणतात की,
माला फेरत जुग भया,
फिरा न मन का फेर।
कर का मनका डार दे,
मन का मनका फेर।।
संत कबीर म्हणतात की,"हातात जपमाळ पकडून देवाचे नाव घेण्यात लोकांनी अनेक युगे घालवली, पण त्यांच्या मनातील वाईट विचार आणि अहंकार दूर झाला नाही.
हातातील मणी फिरविण्या पेक्षा आपल्या 'मनाचा' मणी फिरवा, म्हणजेच मन शुद्ध करा.या दोह्यात मनाचे महत्त्व सांगितले आहे."
बाह्य ज्ञानापेक्षा प्रेमाचे महत्त्व सांगताना संत कबीर म्हणतात की,
पोथी पढ़ि पढ़ि जग मुआ,
पंडित भया न कोय।
ढाई आखर प्रेम का,
पढ़े सो पंडित होय।।
मोठे मोठे ग्रंथ आणि पुस्तके वाचून जगभरातील अनेक लोक मृत पावले,पण कोणीही खरा ज्ञानी किंवा विद्वान बनू शकले नाही.जो व्यक्ती केवळ प्रेमाचे अडीच शब्द समजून घेतो आणि सर्व मानवांवर प्रेम करतो,तोच खरा ज्ञानी ठरतो.
संत कबीरांचे हे दोहे आजच्या आधुनिक काळातही समाजाला योग्य दिशा दाखवण्यासाठी तितकेच मार्गदर्शक आणि प्रासंगिक आहेत असे म्हणता येईल .
संत कबीर यांचा मृत्यू इ.स. १५१८ (विक्रम संवत १५७५) मध्ये माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला झाला असे मानले जाते. काही इतिहासकारांच्या मते हे वर्ष १५१९ किंवा १४४८ असेही सांगितले जाते,परंतु १५१८ या वर्षावर बहुतांश अभ्यासकांचे एकमत आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय सुमारे १२० वर्षे होते.संत कबीर यांचा मृत्यू उत्तर प्रदेशातील गोरखपूरजवळील 'मगहर' (Maghar) या गावी झाला.तत्कालीन समाजात अशी अंधश्रद्धा पसरली होती की, काशी (वाराणसी) मध्ये मरण आल्यास थेट स्वर्ग मिळतो आणि मगहर येथे मरण आल्यास माणूस पुढील जन्मी गाढव बनतो. कबीरांना ही अंधश्रद्धा आणि ढोंगीपणा मोडून काढायचा होता. म्हणूनच त्यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळात काशी सोडून मुद्दाम मगहर येथे जाण्याचा निर्णय घेतला होता. १२० वर्षाचे वय असतानाही संत कबीर काशी सोडून
मगहरला गेले.त्यांच्या मृत्यूची घटना आणि दंतकथा अशी आहे की,कबीरांचा मृत्यू हा कोणत्याही अपघाताने किंवा हत्येने झाला नाही, तर त्यांनी वृद्धापकाळात नैसर्गिकरित्या आपला देह सोडला.मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर एक अत्यंत प्रसिद्ध चमत्कारिक दंतकथा सांगितली जाते.कबीरांचे अनुयायी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचे होते.त्यांच्या मृत्यूनंतर हिंदू अनुयायांना त्यांच्या पार्थिवावर हिंदू प्रथेनुसार अंत्यसंस्कार (अग्नी संस्कार) करायचा होता,तर मुस्लिम अनुयायांना मुस्लिम प्रथेनुसार दफन करायचे होते. यावरून दोन्ही बाजूंमध्ये मोठा वाद निर्माण झाला. दंतकथेनुसार,जेव्हा वादादरम्यान त्यांच्या मृतदेहावरील चादर बाजूला करण्यात आली,तेव्हा तिथे मृतदेहाऐवजी फक्त काही सुवासिक फुले आढळली.या चमत्काराने भारावून जाऊन दोन्ही धर्माच्या लोकांनी ती फुले आपापसात अर्धी-अर्धी वाटून घेतली.हिंदूंनी त्या फुलांवर हिंदू पद्धतीने समाधी बांधली आणि मुस्लिमांनी त्यांच्या पद्धतीने तिथे मजार (कबर) बांधली.आज गांभीर्याने पाहिल्यास,मगहर येथे कबीरांची समाधी आणि मजार अगदी शेजारी-शेजारी पाहायला मिळतात,जी त्यांच्या सर्वधर्मसमभावाच्या शिकवणीचे प्रतीक मानले जाते.अनंतात विलीन होतानाही संत कबीरांनी समाजाला सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली.अशा महान मानवतावादी संत कबीरांना त्यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन ॥
राज्यस्तरीय संत कबीर
कविराज पुरस्कार प्राप्त
साहित्यिक
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
अमरावती.८०८७७४८६०९


0 टिप्पण्या