Ticker

6/recent/ticker-posts

यशोधरानगर पोलिसांची दमदार कामगिरी


८ गुन्ह्यांचा छडा; चार आरोपी अटकेत, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

चित्रा न्युज प्रतिनिधी 

नागपूर : यशोधरानगर पोलिसांनी चोरी आणि वाहनचोरीच्या गुन्ह्यांविरुद्ध धडक मोहीम राबवत एकाच कारवाईत आठ गुन्ह्यांची उकल केली आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे ५ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दोन संशयितांना चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपींकडून रोख रक्कम जप्त करण्यात आली. अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी यशोधरानगर परिसरातील नुरी महबुबिया जामा मस्जिद येथील दानपेटी फोडून चोरी केल्याची कबुली दिली.

तपासाची व्याप्ती वाढवत पोलिसांनी जप्त वाहनांची पडताळणी केली असता ती नागपूर शहरातील विविध भागांतून चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींच्या सखोल चौकशीतून यशोधरानगर, अंबाझरी, राणाप्रतापनगर, लकडगंज, पाचपावली आणि रामटेक परिसरातील एकूण आठ गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले.

या कारवाईत रोख रक्कम, पाच दुचाकी वाहने आणि सोन्याचे दागिने असा एकूण ५.९८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हस्तगत वाहनांमध्ये बजाज पल्सर एनएस-२००, होंडा अॅक्टिव्हा, हिरो स्प्लेंडर, बजाज पल्सर २२० आणि रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० या वाहनांचा समावेश आहे.

पोलीस उपायुक्त नित्यानंद झा व सहायक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख, पोलीस उपनिरीक्षक वैभव नागे आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या टोळ्यांवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या