गुन्हे शाखेची मोठी कारवाई; 9 आरोपी जेरबंद, 85.98 लाखांचा मुद्देमाल जप्त
चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर : नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्र. 3 ने आंतरराज्यीय स्तरावर केबल चोरी करणाऱ्या संघटित टोळीचा पर्दाफाश करत नऊ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे नागपूर शहरातील दोन केबल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून 2023 मधील दोन जुन्या गुन्ह्यांतील फरार आरोपीही पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.
लकडगंज पोलीस ठाण्यातील अप. क्र. 346/2026 आणि गणेशपेठ पोलीस ठाण्यातील अप. क्र. 203/2026 या केबल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना गुन्हे शाखेला महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिल्यानंतर संपूर्ण रॅकेटचा उलगडा झाला.
अटक करण्यात आलेले सर्व आरोपी दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील रहिवासी असून ते विविध राज्यांमध्ये फिरून केबल चोरीचे गुन्हे करत असल्याचे तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे, सदर आणि मानकापूर पोलीस ठाण्यात 2023 मध्ये दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्यांतील पाहिजे आरोपीही याच टोळीतील असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी आरोपींकडून एक हायड्रा क्रेन, एक आयशर टेम्पो, बीएसएनएल कंपनीच्या केबलचे तुकडे, सात मोबाईल फोन तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत तब्बल 85 लाख 98 हजार 500 रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अटक आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील तपासासाठी लकडगंज पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईत गुन्हे शाखेच्या युनिट क्र. 3 ला सायबर युनिटचेही मोलाचे सहकार्य लाभले.
नागपूर गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईमुळे शहरातील केबल चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होणार असून संघटित गुन्हेगारीविरोधातील पोलिसांची ही महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जात आहे.


0 टिप्पण्या