Ticker

6/recent/ticker-posts

प्रत्येक शाळा करणार ५० झाडांनी शाळेसह हिरवागार परिसर


 खरंच लक्ष साध्य होईल काय ? 
     
       
दरवर्षी वृक्षारोपणाची झाडे जातात कुठे ?

रवि भोंगाने चित्रा न्युज 
साकोली:- नवे शैक्षणिक धोरण सुरू होताच राज्यासह देशभरातील शाळांना वृक्षारोपणाचे काम करावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक शाळांना ५० झाडांनी शाळासह गावातील परिसर हिरवागार करावा लागणार आहे. परंतु यापूर्वीचा अनुभव बघता खरंच हे लक्ष प्रामाणिकपणे साध्य होईल का ? याबाबतीत मात्र शंकाकुशंका निर्माण झालेल्या आहेत. दरवर्षी झाडाचे वृक्षरोपण होत असतांना पुढच्या वर्षी ही झाडे जातात कुठे ? हा प्रश्न दरवर्षी गंभीरपणे घेतला जात नसल्याने हे लक्षात आले आहे. शासकीय वन विभागाच्या रोपवाटिकेवर केला जाणारा लाखो रुपयाचा खर्च त्यामुळे पाण्यात जात आहे. ठिकठिकाणी वृक्षारोपण करतांना केवळ फोटोसेशन दिसून येत असल्याने  वृक्षारोपण कार्यक्रम हे तात्पुरते इव्हेंट बनत असल्याची माहिती आता या निमित्ताने समोर येत आहे. " एक पेड मां के नाम " ही मोहीम काही वर्षापासून सुरू आहे. ही वृक्षारोपण मोहीम शाळांतील इको क्लबच्या माध्यमातून देशभरातील शाळांमध्ये ५ जून ते ३० सप्टेंबर २०२६ या  कालावधीत राबविण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने महाराष्ट्राला ५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत ५३ लाखांहून अधिक झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिलेले असून त्यानुसार राज्यातील प्रत्येक शाळेला किमान ५० झाडे लावावी लागणार आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे आदेश दिलेला आहे. यंदाच्या पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने घेण्यात आलेली हवामान बदल ही संकल्पना आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या धोरणानुसार विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणीय समस्याबद्दल संवेदीशीलता निर्माण करणे, त्यांच्यात पर्यावरणबाबत जबाबदार वृत्ती, वर्तन रुजवण्याचा उद्देश असल्याचे पत्रकात म्हटले आहे. " एक पेड मां के नाम " हा वृक्षारोपण उपक्रम शाळेतील इको क्लबच्या माध्यमातून देशभरातील शाळांमध्ये ५ जून ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत राबवला जाणार आहे. या मोहिमे अंतर्गत २०२६-२०२७  करिता ५३ लाख १ हजार २५७ झाडे लावण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्राला देण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक शाळेने किमान ५० झाडे लावणे क्रमप्राप्त आहे असे नमूद करण्यात आलेले आहे. झाडे लावण्यासाठी शाळेच्या आवारात पुरेशी जागा उपलब्ध नसल्यास घरातील उपलब्ध जागा, रस्त्याच्या कडेला, योग्य सार्वजनिक जागा, शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाडे लावता येऊ शकतात. तसेच विद्यार्थ्यांनी आतापर्यंत लावलेल्या रोपांचे अस्तित्व, देखभाल आणि नियमित निरीक्षण सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, मिशन लाइफ करिता शाळांमध्ये इको क्लबची व्याप्ती वाढवणे, विद्यार्थी शिक्षक आणि स्थानिकांचा सहभाग वाढविण्यासाठी उपाययोजना करून १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत सूचना द्याव्यात असे डॉ. पालकर यांनी स्पष्ट केलेले आहे.
______________________________________________

दरवर्षी शाळेच्या नावावर रोपवाटिकेतून झाडे आणली जातात. ती लावली जातात. सुंदर असे फोटो काढले जातात. नंतर ते फोटो प्रसिद्धी माध्यमावर झळकतात. त्यानंतर ८ दिवसांनी  झाड लावण्यासाठी खोदलेला खड्डाही दिसत नाही आणि ना झाड ! मग तमाशा कशासाठी ? गत कित्येक वर्षापासून ही नवटंकी सुरू आहे. पण हेतू काहीच साध्य होतांना  दिसत नाही. उपक्रम चांगला आहे परंतु झाडे लावणेच नव्हे तर जगणे आणि त्याचे संवर्धन होणे आवश्यक आहे. शासकीय वन विभाग रोपवाटिकेवर लाखो रुपये खर्च करून रोपे तयार केली जातात. ते शासकीय, निमशासकीय, शाळा महाविद्यालयांना पुरवली जातात. नंतर मात्र त्याची वाट लागते. वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन याबाबत जिथपर्यंत प्रत्येकामध्ये प्रामाणिकपणा निर्माण होत नाही, पर्यावरणाच्या बाबतीत गांभीर्य निर्माण होत नाही, पर्यावरणाचे महत्त्व जिथपर्यंत कळत नाही, वृक्ष संवर्धनाबाबत जोपर्यंत आपलेपणा ( जिव्हाळा ) निर्माण होत नाही तोपर्यंत हा उपक्रम केवळ  "शो पीस " ठरत राहील.

कैलास गेडाम.
सामाजिक कार्यकर्ता, जांभळी/सडक.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या