चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-सामाजिक समता आणि सामाजिक न्याय या संकल्पना केवळ विचारांपुरत्या मर्यादित न ठेवता त्या प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात कृतीत उतरविल्या पाहिजेत. समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी उपलब्ध करून देण्याचा संदेश राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कार्यातून दिला. त्यांच्या क्रांतिकारी विचारांचे अनुकरण करणे गरजेचे आहे. बहुजन उद्धारक, शिक्षणाला प्राधान्य देणारे, सामाजिक विषमतेविरुद्ध लढा देणारे आणि आरक्षणाचे जनक असलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य आजही प्रेरणादायी असून त्यांचे विचार आजच्या पिढीला दिशादर्शक आहेत, असे प्रतिपादन ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन समिती संस्थेचे संस्थापक राज्याध्यक्ष तथा ग्राहक संरक्षण परिषदेचे शासन नियुक्त अशासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी केले.
जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूर, ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन समिती संस्था महाराष्ट्र राज्य, लातूर जिल्हा युवक कुणबी मराठा मंडळ, साधूराम ग्रामीण विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूर, वसुंधरा महिला मंडळ, जिजामाता महिला मंडळ अतनूर यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जून रोजी उपरोक्त संस्थेच्या कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती तथा सामाजिक न्याय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सोमनाथ यादव होते. प्रमुख पाहुणे व मुख्य मार्गदर्शक म्हणून नशा मुक्त भारत खुशहल भारत आणि व्यसनमुक्त महाराष्ट्राचे, नशाबंदी चळवळीचे मानसेवी कार्यकर्ते दलितमित्र बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, महाराष्ट्र राज्य समाज कल्याण सल्लागार बोर्डाचे सेवानिवृत्त सचिव बी.एन.कांबळे, हिप्पळनारीच्या सरपंच श्रीमती इंदरबाई रामचंद्र शिंदे, मानवी हक्क संरक्षण व जागृती संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रामचंद्र शिंदे, आरोग्य, व्यसनमुक्ती व मधुमेही मुक्ती अभियानाचे प्रचारक व प्रसारक, नशा मुक्त भारत खुशहल भारत चळवळीचे आरोग्यदूत व व्यसनमुक्ती चळवळीचे कार्यकर्ते बी.जी.शिंदे, असंघटित कामगार काँग्रेसचे जळकोट तालुकाअध्यक्ष कैलास सोमुसे-पाटील, शिवसेनेचे जळकोट तालुकाध्यक्ष मुक्तेश्वर पाटील, अविनाश शिंदे, सैलानी शेख, श्रीकांत बोडेवार, सौ.रूक्मिणी सोमवंशी, सौ.एस.बी.शिंदे, श्रीमती एस.एल.बाबर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीताचे सामूहिक गायन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यंकटेश शिंदे यांनी केले. त्यांनी छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी महाराष्ट्र दलित तरुण संस्था यांच्यासह नागरिक, महिला, विद्यार्थी आणि समतादूत मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या