चित्रा न्युज ब्युरो
नवी दिल्ली: महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक ग्राहकांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ जाहीर केली असून, नवीन दर 1 जूनपासून लागू करण्यात आले आहेत. या वाढीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे तसेच इतर व्यावसायिकांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नवीन दरांनुसार, दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 42 रुपयांनी महागला असून त्याची किंमत आता 3,113.50 रुपये झाली आहे. तर कोलकात्यात प्रति सिलिंडर 53.50 रुपयांची वाढ झाल्याने त्याचा दर 3,255.50 रुपयांवर पोहोचला आहे. विविध महानगरांमध्ये वाढीचे प्रमाण वेगवेगळे असले तरी व्यावसायिक वापरासाठीच्या गॅसच्या खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे.
दरम्यान, 5 किलो क्षमतेच्या एफटीएल (फ्री ट्रेड एलपीजी) सिलिंडरच्या किंमतीतही 11 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीत हा सिलिंडर आता 821.50 रुपयांना उपलब्ध होणार आहे.
विशेष म्हणजे, यावर्षीच्या सुरुवातीपासून व्यावसायिक एलपीजीच्या दरवाढीचा क्रम कायम आहे. जानेवारी 2026 मध्ये दिल्लीत 19 किलोच्या सिलिंडरची किंमत 1,691.50 रुपये होती. त्यानंतर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत सलग वाढ करण्यात आली. विशेषतः मे महिन्यात तब्बल 993 रुपयांची वाढ झाल्यानंतर जूनमध्येही दरवाढ झाल्याने व्यावसायिक ग्राहकांची चिंता वाढली आहे.
सतत वाढणारे इंधन, वाहतूक आणि ऊर्जा खर्च यामुळे व्यवसायांवरील आर्थिक दबाव आधीच वाढलेला असताना एलपीजीच्या नव्या दरवाढीमुळे खाद्यपदार्थांच्या किमतींवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. व्यावसायिक क्षेत्राकडून या वाढीबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.


0 टिप्पण्या