चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली : नंदलाल पाटील कापगते विद्यालय, साकोली येथील एमसीव्हीसी (कौशल्य विकास) विभागातील बिल्डिंग मेंटेनन्स विभागाचे विभागप्रमुख, कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय व विद्यार्थीहित जपणारे शिक्षक प्रा. कैलास लोथे सर यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीनिमित्त विद्यालयात अत्यंत भावपूर्ण वातावरणात निरोप व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य आर. बी. कापगते सर होते. प्रमुख अतिथी म्हणून सेवाज्येष्ठ शिक्षिका रसिका बी. कापगते मॅडम, प्राध्यापिका स्वाती गहाणे मॅडम व इतर मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
याप्रसंगी प्रा. कैलास लोथे सर व त्यांच्या धर्मपत्नी शीलाताई लोथे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
समारंभात एस. आर. देशमुख सर, डी. डी. तुमसरे सर, रसिका बी. कापगते मॅडम, प्रा. स्वाती गहाणे मॅडम तसेच डॉ. अश्विनी लोथे यांनी आपल्या मनोगतातून प्रा. लोथे सरांच्या प्रदीर्घ, समर्पित आणि प्रेरणादायी शैक्षणिक सेवेचा गौरव केला. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य, शिस्त, प्रामाणिकपणा आणि कार्यसंस्कृती रुजविण्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य आर. बी. कापगते सर म्हणाले की, "शिक्षक सेवानिवृत्त होतो; परंतु त्याचे ज्ञान, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या मनावर उमटवलेला ठसा कधीच सेवानिवृत्त होत नाही. प्रा. कैलास लोथे सर यांनी आपल्या कार्यनिष्ठेने, वेळेच्या काटेकोर पालनाने आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या आत्मीयतेने संस्थेची शैक्षणिक परंपरा अधिक समृद्ध केली आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श भावी शिक्षकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल."
सत्काराला उत्तर देताना प्रा. कैलास लोथे सर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, "या संस्थेने मला केवळ नोकरीच दिली नाही, तर आयुष्य घडविण्याची आणि हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची संधी दिली. सहकारी शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि संस्थेच्या व्यवस्थापनाने दिलेले प्रेम, विश्वास व सहकार्य हीच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे. सेवानिवृत्ती हा सेवाप्रवासाचा शेवट नसून समाजासाठी नव्या जबाबदाऱ्यांची सुरुवात आहे." त्यांनी संस्थेप्रती व सर्व सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डी. एस. बोरकर सर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता सर्व उपस्थितांच्या स्नेहभोजनाने आनंददायी वातावरणात झाली. भावनिक वातावरणात पार पडलेल्या या समारंभाने उपस्थितांच्या मनात प्रा. कैलास लोथे सरांविषयीचा आदर आणि स्नेह अधिक दृढ झाला.


0 टिप्पण्या