Ticker

6/recent/ticker-posts

निलागोंदी- मोरगाव रस्त्याला पहिल्या पावसात तलावाचे स्वरूप

                     

खड्ड्यांमुळे प्रवाशांचे हाल

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लाखनी (श.प्र.) : तालुक्याच्या उत्तरेकडील शेवटच्या टोकावर असलेल्या निलागोंदी-मोरगाव या डांबरी रस्त्याची पहिल्याच पावसात दाणादाण उडाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतामुळे रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांत पाणी साचून रस्त्याला अक्षरशः तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला असून शालेय विद्यार्थी, रुग्ण व नोकरदारांचे प्रचंड हाल होत आहेत.

दोन तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा पर्यायी मार्ग :  

निलागोंदी - मोरगाव हा रस्ता साकोली व लाखनी या दोन तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा पर्यायी मार्ग आहे. विकासापासून दूर असला तरी निलागोंदी, मोरगाव, मुंडीपार, सालेभाटा परिसरातील हजारो नागरिक या रस्त्याने दररोज ये-जा करतात. परिसरात इयत्ता 10 वी ते 12 वी पर्यंतच्या खाजगी व जि.प. शाळा असल्या तरी उच्च शिक्षणासाठी बहुतेक विद्यार्थ्यांना सोयीनुसार लाखनी किंवा साकोली येथे जावे लागते.


10 वर्षांपासून दुरवस्था कायम:  

“शासन पायाभूत सोयी उपलब्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे,”असा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मागील 10 वर्षांपासून या रस्त्याकडे शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. डांबरीकरण पूर्णपणे उखडले असून जागोजागी गुडघाभर खड्डे पडले आहेत. पाण्याचा निचरा होण्यासाठी आडवे पाईप किंवा रस्त्याच्या कडेला नालीची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे थोड्याशा पावसातही रस्त्यावर पाणी तुंबून वाहतूक ठप्प होते.


प्रवाशांची खड्डेमुक्त रस्त्याची मागणी:  


“दुचाकी घसरून विद्यार्थी पडतात, एसटी बस खड्ड्यात अडकते, रुग्णवाहिका वेळेत पोहोचत नाही. शेतमाल नेणेही मुश्कील झाले आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली. त्यामुळे रस्त्याचे तातडीने मजबुतीकरण व नव्याने डांबरीकरण करावे. तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी दोन्ही बाजूंना पाईप ड्रेन टाकावेत, अशी मागणी प्रवासी व पालकवर्गाकडून जोर धरू लागली आहे.ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग लाखनी व तहसील कार्यालयात निवेदन देऊन आठवडाभरात काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.प्रवाशी नागरिकांचे म्हणणे आहे की,“आम्हाला स्मार्ट सिटी नको, पण किमान खड्डेमुक्त रस्ता तरी द्या,” अशी आर्त हाक निलागोंदी-मोरगाव परिसरातील नागरिक देत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या