Ticker

6/recent/ticker-posts

दप्तर म्हणजे फॅशन नव्हे, गरज होती !


दप्तर म्हणजे फॅशन नव्हे, गरज होती !
                     


प्रासंगिक:- रवि भोंगाने 

मार खानं ही आमच्या पिढीची दैनंदिन जीवनातील एक सामान्य प्रक्रिया राहिलेली होती. मारणारा आणि मार खाणारा दोघेही  त्याकाळी खुश असायचे. मार खाणारा यासाठी की चला कालच्या पेक्षा तरी आज कमी धोपटला गेलो म्हणून आणि मारणारा आज पुन्हा हात धुवून घ्यायला मिळाले म्हणून. पण खरं सांगायचं म्हणजे त्यावेळी शाळेत गुरुजींचा हाताचा मार खातांना आणि पायांचे अंगठे धरून उभे राहतांना, कान लाल होऊन पिरगळला जातांना आमचा " इगो " कधी आडवा ( हर्ट होत नव्हता ) येत नव्हता. खरं तर आम्हाला " इगो " काय असते हेच माहीत नव्हते.
३० जून २०२६ पासून शाळेचा किलबिलाट दरवर्षीप्रमाणे चिवचिव करू लागला आणि आमची पिढी  ४२ वर्षांपूर्वीच्या फ्लॅशबॅक कॅमेराकडे निघून गेली. त्यावेळी शाळेत जातांना तीनच गोष्टी दिसायच्यात. शाळेची कवेलु आणि चुना लावलेली इमारत, पटांगणातील  चिखल आणि गुरुजींच्या हातातील हिरव्या बांबूची फोकटी. प्रार्थनेनंतर कोण उशिरा येतात त्या करिता आमचे गुरुजी हात धुण्यासाठी ते एखाद्या सुरक्षा रक्षकासारखे सज्ज असायचे, तत्पर असायचे, तयार असायचे. ते दिवस आमच्या पिढीपासून तर त्या अगोदरच्या पिढीपर्यंत नक्कीच आठवणीत राहणारे.
आजच्या सारख्या त्याकाळी स्लॅब टाकलेल्या शाळा नव्हत्या. शाळेच्या समोर गट्टू लागलेली नव्हती आणि शाळेच्या भिंती विविध चित्रांनी रंगविलेल्याही नव्हत्या. त्याकाळी ना आजच्या सारखे वेलकम होते ना " यावे ज्ञानासाठी आणि निघून जावे सेवेसाठी " असे शाळेच्या प्रवेशद्वारावरील भिंतीवर कोरलेली नावे नव्हती. आजच्यासारखे शाळेच्या पहिल्याच दिवशी गुलाब पुष्प घेऊन स्वागत करणारे शिक्षक शिक्षिका नव्हत्याच. होती फक्त क्रीडा शिक्षकाच्या गळ्यात बांधलेली दोरीसह शिटी. दोरीचा आणि शीटीचा एकाच वेळी वापर व्हायचा. शीटीने आवाज वाढवायचा आणि दोरीचा पायावरचा घनघनाताने तोंडातून निघालेला आवाज दाबायचा. हे दोनच मंत्र, तंत्र आणि शिक्षणातले शास्त्र त्यावेळी शिक्षकांकडे होते. त्यातल्या त्यात मास्तरचा पोरगा किंवा पोरगी असली तर बोलायची सोयच नव्हती. मास्तरचा पोरगा हुशार नाही म्हणून गुरुजी आपल्या पोराचा राग काढून त्याला झोडपून काढायचे आणि शाळेतून मास्तर बाप घरी आल्यावर रात्री अभ्यासासाठी बदडून काढायचे ते वेगळे.  त्यामुळे त्याकाळी मास्तरच्या पोराच्या आयुष्यात  20-20 क्रिकेट सामना वाट्याला यायचा. निळी किंवा खाकी हाप पॅन्ट आणि पांढरा शर्ट हा आमच्या पिढीचा त्या वेळेचा शालेय गणवेश. आजच्यासारखे आठवड्यातून ३ गणवेश नव्हतेच. पावसाळ्यात वह्या पुस्तकांची सुरक्षा करण्यासाठी खताची पिशवी किंवा झोरा. ( थैली ) कुणाचं दप्तर आईने शिवलेलं तर कोणी प्लास्टिकच्या खताच्या पिशवीत पुस्तका घेऊन यायचे. त्यावेळी प्लास्टिकच्या पिशव्या नव्हत्याच. त्यामुळे खतांच्या किंवा कापड दुकानातून खरेदी केलेली दुर्मिळ पिशवी हीच आमची त्यावेळची स्कूल बॅग असायची. शाळेत उशिरा गेले तर मास्तर फोकाटून काढायचे आणि घरी आल्यावर मास्तरने सांगितल्याप्रमाणे अभ्यास करत नाही म्हणून बापही झोडपून काढायचा. भर पावसाळ्यात आमची पिढी अशी दोन्ही कडून आलटून पालटून पावसाने झोडपल्यासारखे झोडपली जायची. त्या नंतर रात्री मातीच्या भांड्यातील ( हांडी ) भात खाऊन ताणून देणारी आमची पिढी. ते शाळेचे दिवस आजच्या सारखे नाहीतच. त्या काळात मातीच्या भांड्यामध्ये शिजवलेला भांड्यातील अन्नाचा सुगंध आजच्या कुकरच्या भांड्यात येईल काय ? आज स्कूल बॅग आल्यात, पाण्याची बॉटल आली, रेनकोट, रंगीबेरंगी छत्री आल्यात, हाय पावरच्या सायकली आल्यात, पायातले शूज मोजी आलीत. त्यावेळी चप्पलचा जमानाच नव्हता. पण आनंद होता. शाळेची सुट्टी झाल्यानंतर पावसात भिजायचाआनंद आगळा वेगळा असायचा. गावाच्या बाहेर असलेली शाळा आणि घराकडे जाताना पाऊसही कपडे धुतल्याप्रमाणे धु धू धुऊन काढायचा. आज कालाय: तस्मे: नमः म्हणावे लागेल. आम्ही त्या काळात तसे जगलो म्हणून आम्ही आमच्या नव्या पिढीला तसे वागवू शकत नाही. नवीन काळाप्रमाणे आपल्याला चालावे लागेल. प्रत्येक गोष्टीत जुने सोने म्हणून चालणार नाही. नव्या पिढीच्या दिशेने आपल्याला किमान एक पाऊल चालावे लागेल. जुने जे चांगले आहेत ते घ्यावे आणि नवीन जे आहे ते देखील थोडेफार घ्यावे आणि दोन्ही गोष्टीची थोडीफार सांगड घालून आपल्या पिढीने त्या दिशेने वाटचाल करणे  हेच आपल्या हातात आहे असे म्हणायला हरकत नाही. दप्तर ही फॅशन नव्हे, नव्हती ही गोष्ट जरी खरी असली तरी " स्कूल बॅग " फॅशन झाली हे तुमच्या आमच्या  पिढीला स्वीकारावेच लागेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या