प्रतिनिधी : राजेश येसेकर
भद्रावती :चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील घोडपेठ येथे रविवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावर पडलेल्या बारीक गिट्टीमुळे दुचाकी घसरून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मृतकाचे नाव अनिल सुधाकर बावणे रा. शिवाजीनगर, भद्रावती असे आहे. ते आपल्या ॲक्टिवा MH-34-CS-7875 ने भद्रावतीहून चंद्रपूरकडे ड्युटीवर जात होते.
दि. 19 जुलै रोजी दुपारी सुमारे 2 वाजताच्या सुमारास घोडपेठ परिसरात महामार्गावर रस्त्यावर पडलेल्या बारीक गिट्टीवरून दुचाकीचा ताबा सुटला. वाहन घसरताच मागून येणाऱ्या RJ-17-CB-3519 क्रमांकाच्या ट्रकखाली ते आले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातातील विशेष बाब म्हणजे मृतक अनिल बावणे यांनी हेल्मेट परिधान केले होते. मात्र अपघाताची तीव्रता इतकी होती की हेल्मेटचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. हेल्मेट असूनही जीव वाचू शकला नाही, यावरून अपघाताची भीषणता लक्षात येते.
घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे हलवण्यात आला. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
रस्त्यावर पडलेली बारीक गिट्टी हेच अपघाताचे कारण असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. संबंधित ट्रक, चालक आणि अपघाताच्या सर्व परिस्थितीची चौकशी ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती पोलीस करत आहेत.


0 टिप्पण्या