Ticker

6/recent/ticker-posts

ज्येष्ठ कलावंतांच्या मागण्यांसाठी २४ ऑगस्टपासून श्रीकांत नागदिवे यांचे बेमुदत आमरण उपोषण


नव्याने गठित निवड समिती रद्द करण्यासह तीन प्रमुख मागण्या; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

चित्रा न्युज प्रतिनिधी

भंंडारा : राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेतील निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, नव्याने गठित करण्यात आलेली अशासकीय सदस्य निवड समिती तात्काळ रद्द करावी आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ व लोककलावंतांना निवड समितीत स्थान द्यावे, या मागण्यांसाठी अमरकला सांस्कृतिक संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत अंबादास नागदिवे यांनी २४ ऑगस्ट २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, त्रिमूर्ती चौक येथे बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

अमरकला सांस्कृतिक संघटनेच्या वतीने ७ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन नव्याने गठित करण्यात आलेली निवड समिती रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. या समितीतील काही सदस्य स्वतः कलावंत नसल्याचा आरोप संघटनेने केला असून, अशा सदस्यांकडून जिल्ह्यातील वृद्ध व ज्येष्ठ कलावंतांची योग्य निवड कशी होणार, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

तीन प्रमुख मागण्या

संघटनेने प्रशासनासमोर प्रमुख तीन मागण्या मांडल्या आहेत.
१) राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेची जिल्ह्यात नव्याने तयार करण्यात आलेली अशासकीय सदस्य निवड समिती तात्काळ रद्द करावी.
२) जिल्ह्यातील लोककलेतील नामवंत साहित्यिक व ज्येष्ठ कलावंतांचा निवड समितीत समावेश करावा.
३) योजनेअंतर्गत बोगस कलावंतांना मिळणारे मानधन तात्काळ बंद करून पात्र व गरजू कलावंतांची फेरतपासणी करावी.

दरम्यान, तालुक्यातील काही बोगस कलावंतांना आर्थिक देवाण-घेवाण करून मानधन मंजूर करून दिल्याचा आरोपही संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत नागदिवे यांनी निवेदनातून केला आहे. या आरोपांची प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करावी, तसेच नव्याने निवड करण्यात आलेले समिती सदस्य खरोखर कलावंत आहेत की नाहीत, याचीही पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सातही तालुक्यांमधील ज्येष्ठ व लोककलावंतांना निवड समितीत प्रतिनिधित्व मिळाल्यास पात्र कलावंतांना न्याय मिळेल, असा संघटनेचा दावा आहे. अन्यथा अनेक खरे व गरजू कलावंत मानधन योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या मागण्यांसाठी संघटनेने प्रशासनाला दहा दिवसांची मुदत दिली होती. मात्र, ही मुदत पूर्ण होऊनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही किंवा चर्चेसाठी पुढाकार घेण्यात आला नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

त्यामुळे आता २४ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्रिमूर्ती चौक येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असून, मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका श्रीकांत अंबादास नागदिवे यांनी घेतली आहे. त्यामुळे प्रशासन या आंदोलनाची कशी दखल घेते, याकडे जिल्ह्यातील ज्येष्ठ व लोककलावंतांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या