चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :-इंडियन रेडक्रॉस सोसायटी, भंडारा यांचे मानद सचिव डॉ. नितीन तुरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवी व सोसायटीचे आजीवन सदस्य श्री. सेवकराम साहू,सावरी (जवाहरनगर) यांनी मरणोत्तर अवयवदान करण्याचा संकल्प सर्वसंमतीने जाहीर केल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
श्री. साहू यांनी मरणोत्तर अवयवदानासंदर्भातील लिखित पत्र नुकतेच रेडक्रॉस सोसायटी, "ओळख" महाग्रंथ प्रकाशन मंडळ आणि मीरा महिला बहुउद्देशीय समिती (तुमसर) यांच्या संयुक्त विद्यमाने खरबी (ठाणा पेट्रोल पंप) येथे आयोजित सभेत रेडक्रॉस सोसायटीच्या श्रीमती मीरा भट, अॅड. कीर्तिमाला जयस्वाल, सईद शेख, चिंधुजी वंजारी आदी प्रमुख पाहुण्यांकडे सुपूर्द केले.
यावेळी डॉ. रुद्रसेन भजनकर, मुकुंदा वंजारी, विक्की डोए, अमोल माणूसमारे, सुमन अराठे, राजेश गाडरिए, नम्रता बागडे, वासुदेव निर्वाण, संगीता डहाके, आँचल मेश्राम, राजू दुपारे, निश्चल येनूरकर, रिजवान आदी मान्यवर उपस्थित होते. साहित्यिक राजू खवसकर यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन केले.
काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जिल्हा शाखा भंडारा यांच्या वार्षिक आमसभेत आसगाव येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल समाजसेवी सेवकराम साहू यांचा जिल्हाधिकारी तथा जिल्हा शाखेचे अध्यक्ष श्री. सावनकुमार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता.


0 टिप्पण्या