चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :-रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून पतंजली महिला समितीच्या वतीने आज भंडारा जिल्हा कारागृहात रक्षाबंधनाचा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. कारागृहातील बंदीजन तसेच कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना भगिनींनी रक्षासूत्र बांधून बंधुभाव, माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.
जिल्हा कारागृह अधीक्षक जगताप सर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. रक्षासूत्र बांधताना बंदीजनांनी आपल्या चुका सुधारून समाजाच्या मुख्य प्रवाहात परतावे आणि पुन्हा कधीही कारागृहात येण्याची वेळ येऊ नये, असा सकारात्मक व प्रेरणादायी संदेश पतंजली महिला समितीच्या भगिनींनी दिला.
या कार्यक्रमाला महिला पतंजली राज्य संवाद प्रभारी वैशालीताई गिरीपुंजे, राज्य कार्यकारिणी सदस्य कांचनताई ठाकरे, जिल्हा महामंत्री अनिता खेडीकर, सामाजिक कार्यकर्त्या प्रभाताई ढोके तसेच योग साधिका रेखा राऊत, भारतीताई सोनटक्के, सपना गंगवाने, दिपा कोल्हे, माधूरी राखडे आणि छाया मते यांची उपस्थिती होती.
पतंजली महिला समितीच्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. “चूक झाली म्हणून आयुष्य संपत नाही; सुधारण्याची संधी मिळाली तर नव्या आयुष्याची सुरुवात करता येते,” हा माणुसकीचा संदेश या रक्षासूत्राच्या माध्यमातून देण्यात आला.


0 टिप्पण्या