श्रावण विशेष : रवि भोंगाने
खरं म्हणजे आम्हाला कोणी विचारले की, तुम्हाला कोणता ऋतू आवडतो ? तर मला पावसाळा ऋतू सांगायला मनापासून आवडेल आणि त्यातही श्रावण मास. श्रावण महिन्यातील तो इंद्रधनुष्य त्यात रिमझिम पाऊस. अशा पावसात मला ओले चिंब भिजायला फार आवडते. सर्वत्र कशी हिरवा शालू पांघरून वसुंधरा श्रावण मासा करिता नटून थटून सज्ज असते. चारही बाजूला डोळ्यांचे पारणे फेडून टाकणारे वृक्षवल्ली, रंगीबिरंगी फुले, आंबट गोड रसरशीत फळे, एका क्षणात जिभेला पाणी सोडायला लावणारी करवंद आणि त्याही पलीकडे भर पावसात रस्त्याच्या कडेला उभे राहून मन भिजायला लावणारा तो पाऊस आणि ती... असो. श्रावण आला की, श्रावणातील असंख्य गाणी मनाभोवती पिंगा घालायला लागतात. मग ते गदिमांचे " श्रावण आला गं वनी श्रावण आला, दरवळे गंध मधुर ओला " हे गीत असो. किंवा मग बालकवी ( त्र्यंबक बापूजी ठोंबरे ) यांची " श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे " किंवा मंगेश पाडगावकरांचे " श्रावणात घन निळा बरसला " किंवा सुमन कल्याणपुर यांच्या आवाजातील " रिमझिम झरती श्रावण धारा ". अशी असंख्य नितांत सुंदर गाणी असोत. मनाला वेड लावणारी किंवा मग हृदयाला भेगा पाडणारी गाणी असोत. श्रावणाच्या आगमनाने सृष्टीत होणारा बदल आणि मनातील भाव भावनांची अतिशय सुंदर वर्णन सर्व कवींनी केलेले आहे. आणि त्या कवितांना उत्कृष्ट मधुर संगीताचा साज चढवून श्रोत्यांपर्यंत पोहोचवायचे काम संगीतकारांनी केलेले आहे. पावसाळा सुरू झाला की अनेक जण विशेषतः महिला या श्रावण महिन्याची आतुरतेने वाट बघत असतात. श्रावण महिना म्हटलं की सर्व सणांचा राजा मानला जातो. त्यामुळे श्रावण महिन्याचे महत्त्व आपल्याकडे अधिक आहे. श्रावण चातुर्मासातील सर्वात श्रेष्ठ महिना म्हणून याची ओळख आहे. आषाढी अमावस्येला दिव्याची आवस केल्यानंतर सर्व व्रत वैकल्यांना सुरुवात होत असते. यानंतर निसर्गातील वातावरण बदललेले असते. ऊन पावसाचा खेळ श्रावणमध्ये सुरू असतो. रसरशीत हिरव्या भाज्यांचा हा महिना. श्रावण महिना उत्सवाचा महिना म्हणूनही ओळखला जातो आणि म्हणून त्याला सणांचा राजा श्रावण असे म्हणतात.
खऱ्या अर्थाने जिवती अमावस्या सणापासून श्रावण मासाला प्रारंभ होत असतो. अशात रिमझिमणारा श्रावण पाऊस सरीसह आनंदाच्या सरी घेऊन येत असतो. अशा या श्रावणात सप्तरंगी इंद्रधनुष्य आकाशाच्या पडद्यावर आपले चित्र रेखाटणारच. श्रावणाचा देखणा अविष्कार निसर्गात या महिन्यात पावलोपावली जाणवत असते. श्रावण महिना म्हणजे सणाची रेलचेल असणारा महिना. श्रावणातील पहिला सण म्हणजे दीपपूजा ( जिवती ), त्यानंतर नागपंचमी. आगामी काळातील स्वातंत्र्य दिन ( देशभक्ती यज्ञात आपल्या प्राणाची आहूती देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना स्मरण करित असल्याचा महिना. त्यानंतर रक्षाबंधन, पारशी नववर्ष दिन, श्रीकृष्ण जन्माष्टमी. अवकाशात कृष्ण मेघांची बरसात करीत असतानाच घरोघरी घनश्याम दाखल होत असतो. सणांची रेलचेल असलेल्या आनंदी श्रावण मासाची सांगता पोळा या सणाने होत असते. श्रावण मास हा नेहमी शाकाहारी महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात बहुतांश घरी मांसाहारी आहार वर्ज असतो. या महिन्यात ढगाळ वातावरण रोगराईला पोषक असल्याने आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही अनेक जण मासाहारापासून दूर राहत असतात. श्रावण मास हा सण सगळ्या गोष्टीतून बाहेर पडला तर खऱ्या अर्थाने प्रेमाचा गुलमोहर फुलवितो. पावसाच्या साथीने श्रावणात अनेक आठवणी कवटाळून येतात. श्रावणातील रिमझिम अशी अंगोपांगी रोमांच निर्माण करीत असते. त्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात गर्दी करीत असतात. असे असतांना हलकीशी सर अंतर्मनावर शिडकावा करून जात असते.
" श्रावण सर बाहेरी
मी अंतरी भिजलेला
पंखी खूपसून चोच
एक पक्षी निजलेला "
या ओळी अंतर्मनाला संपूर्णपणे भिजवून जातात, ओले चिंब चिंब करून जातात. निसर्ग एक जीवन जगण्याची मधुशाळा आहे. एक प्रार्थना आहे, नव्हे ती एक आराधना आहे. असेच तुमच्या आमच्या आयुष्यात हिरवी स्वप्न पेरणारा, अंतर्मनाला सुखवणारा, रंगीबेरंगी सुगंधी फुलांची उधळण करणारा. सर्वांना हवा हवासा वाटणाऱ्या श्रावण मासाचे चला आपण स्वागत करू या !


0 टिप्पण्या