Ticker

6/recent/ticker-posts

आता लक्ष उपसरपंच निवडणुकीकडे

 कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324


भंडारा :-लाखनी तालुक्यात नुकत्याच ५१ ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक पार पडली. काही गावातील राजकीय पक्षाच्या समविचारी कार्यकर्त्यांनी तर काही गावात भिन्न विचारधारेच्या पक्ष कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन गाव विकासाकरिता आघाडी तयार करून निवडणूक लढविली होती. त्यात काहींना यश तर काहींना अपयश आले असले तरी आता समर्थकांचे लक्ष उपसरपंच निवडणुकीकडे लागले आहे. 
          नोव्हेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका मतदार यादी अध्यावत नसल्याचे कारणावरून पुढे ढकलण्यात आल्याने ५१ ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीची अधीसूचना जारी करण्यात आली. अनेक गावात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी समविचारी पक्षासोबत तर काही ठिकाणी भिन्न विचारधारेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आघाडी स्थापन करून निवडणुका लढविल्या. मुरमाडी/सावरी, पिंपळगाव, पालांदूर, केसलवाडा/वाघ, गडेगाव, कनेरी/दगडी, मुरमाडी/तूप, कवलेवाडा, सालेभाटा या सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीसह ५१ ग्रामपंचायतीची निवडणूक शांततेत पार पडली. मत मोजणी नंतर काही गावात सरपंचाची पॅनल अल्प मतात तर काही गावात विरोधी पक्षांकडे सदस्य संख्या अधिक आहे. त्यामुळे उपसरपंच पदी कोण विराजमान होणार या कडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 
*अल्प मतातील उपसरपंच होण्याची शक्यता(चौकट)*
उपसरपंच निवडणुकीत सरपंचालाही मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. त्यानंतर समान मते पडल्यास निर्णायक मताचा अधिकारही सरपंचाकडे राखून ठेवण्यात आला आहे. जसे सरपंच गटाकडे ३ आणि विरोधी गटाकडे ४ ग्रामपंचायत सदस्य असतील तर उपसरपंच निवडणुकीत सरपंच आपल्या गटाकडे मतदान करेल. त्यामुळे सरपंच गटाचे ४ आणि विरोधी गटाचे ४ अशी समान मते होतील. समान मते पडल्यामुळे निर्णायक मत सरपंच आपल्याच गटाकडे देईल आणि अल्प मतातील आघाडीचा उपसरपंच होईल. 
*उपसरपंच निवडणुकीत सरपंचाचे मतदान योग्य की अयोग्य ?(चौकट)*
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचाची थेट जनतेतून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे तो ग्रामपंचायत सदस्य नाही. उपसरपंच निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्यच मतदान करतात. पण सरपंचालाही उपसरपंच निवडणुकीत मतदानाचा अधिकार देणे योग्य की अयोग्य ? अशा चर्चांना पेव फुटले आहे. 
*प्रतिक्रिया/स्टेटमेंट(चौकट)*
भारतीय राज्यघटनेने एक व्यक्ती एक मताचा अंगीकार केला आहे. पण विद्यमान सरकारने सरपंचाला २ मतांचा अधिकार देऊन घटनेची पायमल्ली केली आहे. 
*आकाश कोरे सदस्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या