Ticker

6/recent/ticker-posts

दिव्यांगजनांना सोयीस्कर असे मोफत घरे उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच घरकुल योजना राबवणार -कॉ.आडम मास्तर यांची दिव्यांगदिनी घोषणा

दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885

सोलापूर :- दिव्यांगजनांना सोयीस्कर असे मोफत घरे उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच घरकुल योजना तसेच मोफत धान्य व विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी दिव्यांगजनांना पिवळे रेशनकार्ड मिळवून देणार, तर दिव्यांगांसाठी महानगरपालिकेत ठेवण्यात आलेल्या ५% राखीव निधीतून प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला दरमहा ५ हजार रुपये उदरनिर्वाह भत्ता देण्यास भाग पाडणार असा संकल्प माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांनी 3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांगदिनी सोडला.
           
  3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त लालबावाटा दिव्यांग श्रमिक संघटनेच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 

या रॅलीच्या समारोप समारंभात अध्यक्षस्थानावरून आडम मास्तर बोलत होते.पुढे बोलताना मास्तर म्हणाले देशात तीन कोटींपेक्षा जास्त दिव्यांगजन असून त्यांच्या कल्याणार्थ राज्य व केंद्र शासनाच्या अनेक योजना आहेत,मात्र त्या योजना कागदावरच रेंगाळत असून लाभापासून कोट्यवधी दिव्यांगजन वंचित आहेत.दिव्यांगांच्या अखर्चित निधीतून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ५ हजार रुपये सानुग्रह अनुदानाची मागणी केली असता तत्कालीन आयुक्त पी शिवशंकर यांनी दिव्यांगांना सापत्न वागणूक देऊन त्यांचा अपमान केला,भेटण्याची वेळ देऊनसुद्धा भेटायचे टाळून दिव्यांगांना तुच्छ वागणूक दिली,त्यामुळे दिव्यांगजनांवर मानसिक आघात झाला असून ही घटना दिव्यांगजन कदापि विसरणार नाहीत. नवीन वर्षानिमित्त अखर्चित निधीतून दिव्यांग लाभार्थ्याना ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान अदा करावे यासाठी आपण येत्या सोमवारी आयुक्तांना निवेदनाद्वारे मागणी करणार असल्याचे आडम यांनी सांगितले.

तत्पूर्वी संघटनेचे सचिव इलियास सिद्दीकी यांनी प्रास्ताविक केले,तर संघटनेचे अध्यक्ष बाबूलाल फनिबंद,कॉ कामीनीताई आडम आणि रे नगर फेडरेशनचे सचिव कॉ युसूफ मेजर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी उपस्थित असलेले संघटनेचे उपाध्यक्ष सुशील गुजले,सदस्य सुरेखा गडदे,शबाना शेख आणि इतर दिव्यांगजनांनी आडम मास्तर यांच्यावर विश्वास व्यक्त करून दिव्यांगांसाठी मोफत घरकुल योजना राबवण्याची मागणी केली.त्यावर उत्तर देताना आडम मास्तर म्हणाले की दिव्यांगजनांच्या स्वप्नातील बंगला देण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार असून त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवा.कार्यक्रमाच्या सुरुवातीला ब्रेल लिपीचे प्रणेते लुई ब्रेल व प्रख्यात लेखिका डॉ हेलन केलर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी मंचावर संघटनेचे उपाध्यक्ष आसिफ पठाण खजिनदार अकिल शेख,सहसचिव प्रभाकर कलशेट्टी आणि इब्राहिम मुल्ला,सलीम शेतसंदी, अशोक बल्ला,हाजीमलंग शेख,अँड.अनिल वासम आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इलियास सिद्दीकी यांनी केलं,तर आभार अकिल शेख यांनी मानले. 

तत्पूर्वी सकाळी ११ वाजता विजापूर वेस येथून दिव्यांगजनांची जनजागृती रॅली काढण्यात आली.

या रॅलीत कॉ नरसय्या आडम,कॉ एम एच शेख सर,कॉ कामिनी आडम,लालबावाटा दिव्यांग श्रमिक संघटनेचे सर्व पदाधिकारी व असंख्य दिव्यांगजन सहभागी झाले होते।या रॅलीमध्ये बोधपर घोषवाक्याचे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.( रॅली 1 मिनिट )हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युसूफ शेख,अनिल घोडके,शहाबुद्दीन शेख,शाम आडम,सद्दाम शेख,अबुहुरेरा शेख,जाकीर पटेल,इम्रान शेख आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या