दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885
मुंबई :- पूर्व विदर्भातील चंद्रपूर , गडचिरोली , भंडारा , गोंदिया व नागपूर या पाच जिल्ह्यांमधील कृषीपंप ग्राहकांना दिवसा १२ तास ३ फेज वीज पुरवठा करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना दिले असल्याची माहिती , वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईत दिली . यामुळे या जिल्ह्यातील कृषीपंप ग्राहकांना दिवसा १२ तास वीजपुरवठा होणार आहे . राज्य शासनाच्या उद्योग , ऊर्जा व कामगार विभागाने दि . ३० नोव्हेंबर रोजीच्या पत्राद्वारे महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांना आदेशित केले आहे . विदर्भातील चंद्रपूर , गडचिरोली , भंडारा , गोंदिया व नागपूर या पाच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात काम करताना वन्य प्राण्यांचा धोका असल्याने तसेच कृषीपंपासाठी ८ तासांच्या वीज उपलब्धतेमुळे धानपिकास पुरेशा प्रमाणात सिंचन होत नसल्याने या जिल्ह्यातील कृषीपंपांना दिवसा १२ तास ३ फेज वीज पुरवठा करण्याची विनंती वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती . उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विनंतीची त्वरित दखल घेत कृषीपंपाना दिवसा १२ तास ३ फेज वीज पुरवठा करण्याचे निर्देश दिले . त्यानुसार ३० नोव्हेंबर रोजी महावितरणला लेखी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत . सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना याबाबत त्वरित सूचित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे . या निर्णयामुळे विदर्भातील चंद्रपूर , गडचिरोली , भंडारा , गोंदिया व नागपूर या पाच जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे .


0 टिप्पण्या