Ticker

6/recent/ticker-posts

शिवणकर वक्तृत्व स्पर्धेत प्रेमराज शिंदे प्रथम, आरती इंगोले द्वितीयबालविद्या मंदिर हायस्कूल : म.श. शिवणकर विभागीय वक्तृत्व स्पर्धा

रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५


परभणी : बाल विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे संस्थापक कै. म.श. शिवणकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शनिवारी (दि.24) आयोजित केलेल्या विभागीय वक्तृत्व स्पर्धेत बोरी येथील ज्ञानोपासक विद्यालयातील विद्यार्थी प्रेमराज राजेश शिंदे याने प्रथम, कुरंदा येथील नरहरी कुरुंदकर माध्यमिक विद्यालयातील कु. आरती बाळू इंगोले हीने द्वितीय तर गंगाखेडच्या विद्यनिकेतन हायस्कूलच्या प्रवीण ज्ञानेश्‍वर केंद्रे याने तृतीय क्रमांक पटकाविला.
          या विभागीय वक्तृत्व स्पर्धांचे शनिवारी सकाळी उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार झरकर हे अध्यक्षस्थानी प्रमुख अतिथी म्हणून संस्था सचिव डॉ. विवेक नावंदर, सहसचिव अ‍ॅड. संजय देशपांडे, संस्था सदस्य विलास पोहंडुळकर, पवन झांजरी, एम. जी. विहिटकर यांच्यासह मुख्याध्यापिका श्रीमती श्यामा मुधळवाडकर, उप मुख्याध्यापक अरुण बोराडे तसेच बाल विद्यावर्धिनीचे भंवर, बाल विद्या विहारचे अनिकेत शहाणे, प्राथमिक विभागाचे कच्छवे, पर्यवेक्षक पी. व्ही. रुघे, आर. जी. तुम्मेवार, बी. के. कोपरटकर यांची उपस्थिती होती.
        कार्यक्रमाची सुरुवात कै. म. श. शिवणकर यांच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने झाली. प्रशालेच्या संगीत विभागाने स्वागत गीतातून मान्यवरांचे व उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण बोराडे यांनी केले. यामधून त्यांनी कै. शिवणकर गुरुजी यांच्या जीवन कार्याविषयी माहिती विषद केली. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्ञानेश्‍वरी अकॅडमीचे संचालक प्रा. नितीन उंडाळकर संचालक, समर्थ विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. मृदुल धारासुरकर, आकाशवानी केंद्राच्या निवेदिका सौ. सुमेधा कुलकर्णी यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते परीक्षकांचा शाल, पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
        या प्रसंगी डॉ. नावंदर यांनी आपल्या मनोगतातून वक्तृत्वाने व्यक्तिमत्व खुलते व आदर्श नागरिक घडण्यास मदत होते, असे प्रतिपादन केले. कै. शिवणकर गुरुजींच्या कार्याविषयी अभिमान असल्याचे सांगून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. अ‍ॅड. पोहंडूळकर यांनी कै. शिवणकर यांनी कडक शिस्तीतून व संस्कारातून विद्यार्थ्यांना घडवले. असे सांगत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी स्पर्धेचं आयोजन केलं जातं, असे सांगितले.
         डॉ. झरकर यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात सर्वांगीण विकासासाठी स्पर्धा महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत, कै. शिवणकर गुरुजी यांनी दिव्यांग असूनही शाळेला भक्कम पाया दिला, असे म्हटले. या स्पर्धेत विभागातील 37 संघानी सहभाग नोंदवला. स्पर्धेचे हे 47वे वर्ष आहे. या स्पर्धेची नियमावली स्पर्धा प्रमुख जी. के. जुमडे यांनी सांगितली. वेळ अधिकारी म्हणून प्रशालेचे सुशील कदम व महेश फड यांनी काम पाहिले.
             या स्पर्धेमधील विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिक अनुक्रमे रोख रुपये 2500, 2000, 1500 व उत्तेजनार्थ पारितोषिक दोन प्रत्येकी रोख रुपये 700, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
        या स्पर्धेत ज्ञानोपासक महाविद्यालय बोरीचा चि. प्रेमराज राजेश शिंदे प्रथम, कुरुंदा येथील नरहर कुरुंदकर विद्यालयाची विद्यार्थीनी कु. आरती बाळू इंगोले द्वितीय,गंगाखेड येथील विद्यानिकेतनचा विद्यार्थी चि. प्रवीण ज्ञानेश्‍वर केंद्रे हा तृतीय तर भारतीय बालविद्या मंदिरची विद्यार्थीनी जान्हवी विजय स्वामी व कौठा येथील माणकेश्‍वर विद्यालयाची विद्यार्थीनी सानिका शंकर खराडे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके पटकावली. याप्रसंगी परीक्षकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.  
        दरम्यान, सर्व विजयी विद्यार्थ्यांचे संस्थेचे डॉ. पांडुरंग नावंदर, संस्थाध्यक्ष डॉ. नंदकुमार झरकर, सचिव डॉ. विवेक नावंदर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्यामा मुधळवाडकर, सर्व संचालक मंडळ, सर्व सदस्य तसेच उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन आर. वानरे यांनी केले. तर आभार जी. के. जुमडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.याप्रसंगी विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या