कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा :-वन परिक्षेत्र लाखनी व साकोली चे सीमेवर बरडकिन्ही व मोहघाटा वनव्याप्त परिसरात २० ते २५ संख्येत असलेल्या जंगली हत्तीच्या कळपाने हैदोस माजविला असून वनक्षेत्रासह शेतकऱ्यांच्या धानाच्या पुजन्याचेही नुकसान करीत आहेत. कमीतकमी वित्तहानी तसेच जीवितहानी होऊ नये म्हणून वन अधिकाऱ्यांसह कर्मचारीही डोळ्यात तेल घालून दिवस रात्र हत्तीच्या कळपाचे लोकेशन असलेला परिसरात सील करून खडा पहारा देत असल्यामुळे हत्तीच्या कळपाने उडविली वन अधिकाऱ्यांची झोप अशा चर्चा होत आहेत.
वन परिक्षेत्र साकोली चे अधिनस्त सहवन क्षेत्र सानगडी पूर्व मधील नियतक्षेत्र सिरेगावटोला, केसलवाडा, झाडगाव, शिवनीबांध आणि परिसरात अचानक २८ नोव्हेंबर रोजी जंगली हत्तीच्या कळपाचे आगमन झाले. त्यांनी या परिसरात धानाचे पुजने व ऊस शेतीची नासधूस केल्याची माहिती मिळताच उपवनसंरक्षक राहुल गवई, सहाय्यक वनसंरक्षक आर.पी. राठोड वन परिक्षेत्र अधिकारी शेखर मेंढे तथा क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक आणि स्थायी वन मजूरांकडून हत्तीच्या कळपाचे लोकेशन घेऊन जंगली हत्तीचा कळप असलेला परिसर सील केला. तसेच परिसरातील नागरिकांना सरपणासाठी जंगलात जाऊ नये. अथवा वनक्षेत्रालगत असलेल्या शेतजमिनीतही जाऊ नये. याशिवाय घरी मोहफुले असतील तर त्यांची योग्य विल्हेवाट लावावी. अशा ग्रामस्थांना सूचना करण्यात आल्या. हाच हत्तीचा कळप २९ तारखेला चुलबंद नदी ओलांडून लाखनी वन परिक्षेत्रातील वनरक्षक बीट बरडकिन्ही व मोहघाटा परिसरात असल्याची माहिती मिळताच वन अधिकाऱ्यांनी सदर परिसर सील केला असला तरी रात्रीच्या सुमारास हत्तीच्या कळपाने रेंगेपार/कोहळी येथे येऊन ९ शेतकऱ्यांचे धानाचे पूजने व मळणी झालेल्या धानाचे नुकसान करून वनक्षेत्रात पसार झाला. दिवसा या हत्तीच्या कळपाचे योग्य लोकेशन दिसत नसल्यामुळे वन अधिकाऱ्यांची तारांबळ उडते. हाच हत्तीचा कळप परत रात्री सक्रिय होऊन शेतकऱ्यांच्या धानाची नासधूस करतो. या हत्तीच्या कळपावर बंदोबस्तासाठी पश्चिम बंगाल वरून एक चमुही बोलावण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त असले तरी मागील २ दिवसापासून या हत्तीच्या कळपाचा मुक्काम बरडकिन्ही वनक्षेत्रात आहे. वनक्षेत्रालगत असलेल्या गावातील नागरिक भीतीचे सावटाखाली जीवन यापण करीत आहेत. या हत्तीच्या कळपाने नासधूस करू नये यासाठी वन अधिकाऱ्यासह कर्मचारीही रात्रंदिवस तळ ठोकून खडापाहरा देत असल्यामुळे सर्वांचीच झोप उडाली आहे. म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
*मातोश्री गो-शाळेचेही नुकसान(चौकट)*
जंगली हत्तीच्या कळपाने सोमवारी रात्री रेंगेपार/कोहळी येथील ९ शेतकऱ्यांच्या धानाचे पुजने व मळणी केलेल्या धानाचे नुकसान केले होते. परत मंगळवारी रात्रीच्या सुमारास हाच कळप मातोश्री गोशाळा परिसरात आला व मातोश्री गोशाळेतील टिनाच्या पत्र्याचे व झाडांचे नुकसान केले.


0 टिप्पण्या