रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
मुंबई :- महाराष्ट्राच्या बहुजन समाजातील गोर - गरीब , डोंगर दऱ्यांमध्ये राहणाऱ्या मुलांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून पद्मभूषण डॉ . कर्मवीर भाऊराव पाटील यांना १०३ वर्षापूर्वी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली . शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे एकमेव साधन आहे ही कर्मवीरांची दूरदृष्टी होती . म्हणून त्यांनी या मुलांच्या शिक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण केले . किर्लोस्कर , ओगले , कूपर या कंपनीमध्ये कर्मवीरांनी जे काम केले त्या माध्यमातून मिळालेले उत्पन्न , त्यांच्याकडे असलेल्या शेतीच्या माध्यमातील उत्पन्न , किर्लोस्कर कंपनीतील अण्णांचे शेअर्स , आई- वडीलांच्या नावे असलेली शिल्लक रक्कम , पत्नी सौ . लक्ष्मीबाई यांच्या माहेरकडून मिळालेले १०० तोळे सोने , मंगळसूत्र सुद्धा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी विद्याथ्र्यांच्या शिक्षणासाठी खर्च केले . विद्यार्थ्यांनी भीक मागून शिकण्यापेक्षा स्वावलंबनाने , स्वकष्टाने आपले शिक्षण पूर्ण करावे हे कर्मवीरांचे शैक्षणिक तत्वज्ञान होते . यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ' कमवा व शिका ' ही अभिनव योजना राबविली . आज या योजनेला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे . म्हणूनच ' स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद ' हे कर्मवीरांनी संस्थेचे ब्रीद घेतले . कर्मवीरांच्या या कार्याला समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन लोकसहभागातून ही शैक्षणिक चळवळ अधिकाधिक व्यापक केली . बहुजन समाजातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी समाजाने उत्स्फूर्त सहभाग घेतला . या माध्यमातून कोट्यावधी मुलांना शिक्षण मिळाले . आज महाराष्ट्र शैक्षणिक दृष्ट्या अग्रेसर दिसतो आहे त्याला अण्णांचे स्वावलंबी शिक्षणाचे हे तत्वच कारणीभूत आहे असे म्हटले तर अनुचित ठरणार नाही . राष्ट्रपिता महात्मा गांधी , महात्मा फुले , क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले , राजर्षी शाहू महाराज हे कर्मवीरांचे आदर्श होते . याच कालखंडात भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे सुद्धा कर्मवीरांना मोठे सहकार्य लाभले , म्हणून ज्ञानाने समृद्ध असलेली पिढी कर्मवीर निर्माण करू शकले . या सर्व पार्श्वभूमीवर ना . चंद्रकांतदादा पाटील यांनी काल केलेले विधान अत्यंत दुर्देवी आहे . त्याचा संस्थेच्या वतीने निषेध करण्यात येत आहे .


0 टिप्पण्या