Ticker

6/recent/ticker-posts

पिंपळगाव/सडक ऐतिहासिक शंकरपटाचे ९८व्या वर्षात पदार्पण

२५ व २६ जानेवारी रोजी द्वीदिवसीय शंकरपटाचे आयोजन 

विदर्भासह परराज्यातील बैलजोड्या शंकरपटात धावणार


कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा :- पारतंत्र्यात सुरू झालेल्या पिंपळगाव/सडक ऐतिहासिक शंकरपटाने १९४४ ला रौप्य महोत्सव, १९६९ मध्ये सुवर्ण महोत्सव, १९९४ ला अमृत महोत्सव साजरा केला असून शतकाकडे वाटचाल करणाऱ्या या शंकरपटाचे हे ९८वे वर्ष असून वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर होणारा हा शंकरपट यावर्षी योगायोगाने प्रजासत्ताक दिनी येत असून या शंकरपटात विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगढ, व आंध्र प्रदेशातून शर्यतीसाठी बैलजोड्या येतात. रात्री मनोरंजनपर विविध कार्यक्रमातून झाडीपट्टीतील लोककलेची परवणी शौकिनांना मिळते. आकर्षक पारितोषिकांमुळे पिंपळगाव/सडक शंकरपटाचा तालुक्यातील नावलौकिक आहे. 
            पिंपळगाव/सडक चे माजी मालगुजार चिंतामणराव घारपुरे पाटील यांना विवाहानंतर बऱ्याच वर्षांनी पुत्ररत्न जन्मास आल्यामुळे त्याचे नावावर बैलांच्या शर्यती लावण्यावर तत्कालीन गावातील पंचकमीटीतील पिसाराम कमाने, शिवराम शिवणकर, महारू शिवणकर, सखाराम बोरकर, नन्नुसाव कासार, तात्याराव दिवाणजी, सीताराम कमाने, हरबा कमाने, रामा निनावे, बापुसा नवखरे, अब्दुल कपूर शेख यांचेत एकमत झाल्याने १२ फेब्रुवारी १९२० पासून वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर बैलांच्या शर्यतीस(शंकरपट) सुरुवात करण्यात आली. विजयी जोड्यांना पुरस्कार स्वरूप व्यसन व झेंडी दिली जात असे. रात्री मनोरंजनपर कार्यक्रमांची रेलचेल असे. त्यानंतर नत्थुजी तरोने, गोपी कमाने, नारायण कमाने, वसंतराव शिवणकर, गंगाराम नवखरे यासारख्या दुसऱ्या पिढीतील मंडळींनी शंकरपटाचा वासरा जपून ठेवला. आवश्यकतेनुसार शंकरपटाचे स्वरूप पालटले. पारितोषिक स्वरूपात देण्यात येणाऱ्या झेंडी व व्यसनीची जागा आकर्षक बक्षिसांनी घेतली. १९९४ ला अमृत महोत्सवी वर्षानंतर शंकरपटाचे नेतृत्व नरेश नवखरे व सहकाऱ्यांकडे आले. त्यांनी पिंपळगाव चे नाव पंचकृषित व्हावे. याकरिता प्रथम पाच क्रमांकाचे सुवर्णपदक बक्षीस ठेवले. त्यानंतर बैलांना निर्देयतेने वागविले जाते. या कारणांवरून न्यायालयाने शंकरपटांवर बंदी आणली. तसेच कोविड-१९ ह्या संसर्गजन्य महामारीचे काळात काही वर्षे शंकरपट बंद राहिले. शंकरापट पूर्ववत सुरू व्हावे. या करिता जगत रहांगडाले, प्रभाकर सपाटे ह्या शंकरपट प्रेमींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यास पुरवणी शपथपत्र जोडण्याचे काम पिंपळगाव/सडक चे नरेश नवखरे, सुरेश मते आणि सहकाऱ्यांनी केले. न्यायालयाने बैलजोडी शर्यतींना काही अटी व शर्तीवर शिथिलता दिल्यामुळे २०२२ पासून शंकरपटांना सुरुवात झाली. 
             २०२३ मध्ये प्रजासत्ताक दिनाचे दिवशी वसंत पंचमीचे शुभ मुहूर्तावर २६ व २७ जानेवारी ला नवनिर्वाचित सरपंच श्याम शिवणकर, पट समिती, ग्रामपंचायत कमिटी चे नेतृत्वात शंकरपटाचे ९८व्या वर्षात पदार्पण झाले असून विजयी जोड्यांना रोख स्वरूपात पुरस्कार देण्यात येणार आहेत. यावर्षी पटाची दान १ हजार ३८५ फूट लांब असून उद्घाटन प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, खासदार सुनील मेंढे, माजी आमदार डॉ. परिणय फूके, आमदार अभिजित वंजारी, बीडीसीसी अध्यक्ष सुनील फुंडे, काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, भाजपा जिल्हाध्यक्ष शिवराम गिरेपुंजे, जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जीभकाटे, महिला व बालकल्याण सभापती स्वाती वाघाये, समाजकल्याण सभापती मदन रामटेके, पंचायत समिती सभापती प्रणाली सार्वे, जि. प. सदस्य डॉ. मनीषा निंबार्ते, पंचायत समिती सदस्य किशोर मडावी व गावातील मान्यवरांचे प्रमुख उपस्थितीत सुरू होणाऱ्या पिंपळगाव/सडक ऐतिहासिक शंकरपटाची परवणी तालुक्यातील जनतेला मिळणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या