Ticker

6/recent/ticker-posts

बिबटाचे हल्ल्यात ३ शेळ्या ठार, २ शेळ्या जखमीगडपेंढरी येथील घटना



कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा :-लाखनी येथील वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे अधिनस्त येणाऱ्या गडपेंढरी येथे बिबटाने गोठ्यात शिरून शेळ्यांवर हल्ला केल्याची घटना गुरुवारी(ता.२६) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. त्यात बालचंद्र मोडकू गायधने यांच्या ३ शेळ्या ठार झाल्या तर गोमा मुका कावळे यांच्या २ शेळ्या जखमी झाल्या. क्षेत्र सहाय्यक जे.एन. बघेले, वनरक्षक कृष्णा सानप यांनी पंचनामा केला असला तरी पशुपालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ३ महिन्यातील ही तिसरी घटना आहे. 
              टेकडीच्या पायथ्याशी तसेच आजूबाजूला ओढ्याने वेढलेल्या गडपेंढरी गावालगत हिंस्त्र प्राण्यांचा वावर सुरू असून या हिंस्त्र प्राण्यांकडून शिकारीच्या घटना सातत्याने घडत आहेत. धान शेती परवडेनासी झाली असल्यामुळे शेतीस पूरक व्यवसाय म्हणून शेळी पालन केले जाते. बालचंद्र गायधने व गोमा कावळे यांनी रात्री चारापाणी करून शेळ्या गोठ्यात बांधून कुटुंबीयांसह झोपी गेले असता गुरुवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात शिरून हल्ला केला. त्यात बालचंद्र गायधने यांच्या ३ शेळ्यांना ठार केले तर गोमा कावळे यांच्या २ शेळ्यांना जखमी केले. शेळ्यांच्या गोंगाटाने पशुपालक जागे झाल्याने घटना उघडकीस आली. घटनेची माहिती क्षेत्र सहाय्यक जे. एन. बघेले यांना देण्यात आली. ते वनरक्षक कृष्णा सानप यांचेसह घटनास्थळी आले व शेळ्यांचा पंचनामा केला. तथा पशू वैद्यकिय अधिकारी पोहरा यांना शव विच्छेदनसाठी कळविले. शव विच्छेदनानंतर मृत शेळ्यांना पुरण्यात आले. तर जखमी शेळ्यांवर उपचार सुरू आहे. या गावातील ही तिसरी घटना असल्यामुळे पशू पालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबटाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या