लाखनी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा:- बैल धुण्यासाठी तलावावर गेलेल्या पशू पालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवार(ता.२५) सकाळी १०:०० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृतकाचे नाव नंदकुमार बाळकृष्ण पटले(५२) रा. सालेभाटा, ता. लाखनी असे आहे. लाखनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
मृतक नंदकुमार पटले हे अल्पभूधारक शेतकरी असून पशू पालन करतात. बुधवारी सकाळी ते आपली बैलजोडी धुण्याकरिता गावातील मामा तलावावर गेले होते. बैल घरी परत आले पण नंदकुमार बराच वेळ होऊनही न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला असता तलावातील पाण्यात बुडून मरण पावल्याचे दिसून आले. घटनेची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कोरचे, पोलिस हवालदार सुरेश आत्राम यांनी घटनास्थळी पोहचून कुटुंबियांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून सर्व सोपस्कार आटोपले व उत्तरीय परिक्षणासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे पाठविण्यात आला. शव परिक्षणानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. स्थानिक स्मशानभूमीत त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुरणलाल रामचंद पटले यांचे फिर्यादी वरून लाखनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. कलम १७४ जाफौ नुसार पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार सुरेश आत्राम तपास करीत आहेत. मृतकास पत्नी व २ मुली आहेत. मन मिळाऊ नंदकुमार च्या अकाली निधनामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.


0 टिप्पण्या