Ticker

6/recent/ticker-posts

पंढरीची वारी : वर्ण व्यवस्थेचा पाया उध्वस्त करणारी साधना !

सुयोग  ठाकरे  तळेगाव दशासर जि.अमरावती मो. 73507 14675

अमरावती :- मित्रांनो जय हरी सत्य कथन हा इतिहासाचा आत्मा आहे. इतिहासातून आपल्याला प्रेरणा घेऊन भविष्याचा वेध घ्यायचा असतो. प्रेरणा चुकली तर भविष्याचा वेध घेता येत नाही. म्हणून आपला इतिहास, आपला सांस्कृतिक संघर्ष, आपल्या संत आणि महापुरुषांचा जीवन संघर्ष, कुठल्या व्यवस्थेशी होता हे नीटपणे आपण समजून घेतलं पाहिजे. जर इतिहास नीटपणे समजून घेतला नाही तर ज्यांनी आपल्या संत महापुरुषांच्या वाटेत काटे पेरले, दगड धोंड्यांची रास उभी केली, वेगवेगळ्या प्रकारचे कटकारस्थान करून त्यांना जगणं मुश्किल केलं, प्रसंगी त्यांची हत्या करून त्यांना संपविण्याचा सुद्धा कधी यशस्वी तर कधी अयशस्वी प्रयत्न केला, अशा शत्रूच्या गोटातील लायकी नसलेल्या म्हणजेच नालायक व्यक्तीला आपले लोक आपल्या महापुरुषांच्या तुलनेत अर्थात गुरुस्थानी मानतात. (अलीकडेच एका अशाच लायकी नसलेल्या व्यक्तीला तुकोबांच्या रथात बसवण्यात आले होते) मग हा गुरु आपल्या लोकांचा ब्रेन वॉश करून त्यांना आपल्या अंकित करून घेतो. 

             अशा पद्धतीने एका जीत्याजागत्या माणसाचे एका रोबो मध्ये रूपांतर केल्या जाते. शेवटी हे रोबो कितीही चांगले असले, कदाचित त्यांच्या गळ्यामध्ये माळ असेल,हातात टाळ असेल,ते देवाचं नावही घेत असतील; परंतु ते रोबोच असतात आणि हे मानवी रोबो त्याच महापुरुषाच्या संप्रदायातील बदल स्वीकारणारे परिवर्तनशील आणि बदल घडवून आणणाऱ्या क्रांतिकारी लोकांच्या विरुद्ध उभे राहतात. प्रसंगी त्यांच्या हत्या करतात. ज्यांची हत्या झाली आणि ज्याने हत्या केली दोघांचीही प्रेरणा एकच, पण इतिहास नीटपणे समजला नसल्यामुळे भक्ताचा अतिरेकी होतो  *इससे सिद्ध यही होता है| भक्त कभी राक्षस बनता है||राष्ट्रसंत||*
परिणाम काय होतो तर कलबुर्गी, गौरी लंकेश, पानसरे आणि दाभोळकर यांची उदाहरणे डोळ्यासमोर आहे.

           आता वारी नीटपणे समजून घेऊ या ! पंढरी हे महाराष्ट्रातील संतांचे माहेरघर आणि पांडुरंग हे महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांचे महादैवत. देव ही सर्वसामान्य लोकांची मानसिक गरज आहे. हे संतांनी ओळखलं होतं आणि म्हणून संतांनी ईश्वराची संकल्पना बदलवून सांगितली. *धकाधकीचा काळ पाहिला| संतांनी उपास्यात बदल केला|| ग्रामगीता||* सर्वसामान्य माणसाच्या भावविश्वातील सर्वोच्च स्थानी कुणाला बसवायचं हे संताना बरोबर माहीत होतं. पंड्ये पुजारी भट भिक्षुकांचा देव हा सोन्याने मढवलेल्या सिंहासनावर कुलूप बंद आणि पहारेकऱ्यांच्या गराड्यात बंदिस्त होता. शूद्रातीशूद्रांना त्यांचं मुखदर्शन तर दूरच पण आसपास फिरकण्याचाही अधिकार नव्हता. असा भटाळलेला आणि विशिष्ट काळामध्ये आमच्या आईच्या स्पर्शाने विटाळल्या जाणारा देव  वाळवंटात आणून संतांनी भक्त आणि भगवंत दोघांनाही या ब्राह्मणी पाशातून मुक्त केलं आणि तो विठ्ठल सर्वसामान्यांचा सखा बनला. 

            पंड्यांचा देव सर्वसामान्यांचे श्रम लुटून पुजाऱ्याचं ढेबरं भरणारा शोषक तर आमच्या वारकरी संप्रदायाच्या संतांचा पांडुरंग विठ्ठल थकल्या भागल्या जीवांच्या जखमांवर हळुवारपणे फुंकर मारून प्रसंगी जनीच्या पायातील काटा काढून दुःख मुक्त करणारा मायाळू कनवाळू परमेश्वर. तो कुणाचा बंधू, तर कुणाचा सखा. स्पृश्य-अस्पृश्य कुणालाही पारखा नसणारा सर्वांचा पाठीराखा. पंड्या पुजाऱ्यांनी ईश्वर प्राप्तीचे सांगितलेले मार्ग हे गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे शोषण करून त्यांना दुःखाच्या खोल दरीत लोटून देणारे होते. पूजेच्या वेगवेगळ्या पद्धती गोरगरिबांचे खिशे कापत होत्या. या पोट भरू दलालांनी व्रतांची इतकी पेरणी समाजामध्ये केली होती की ३६५ दिवसही पुरत नसे. या व्रतांच्या ओझाने सारा बहुजन समाज दबून गेला होता. गोरगरिबांनी श्रमातून मिळवलेला आनंद लुटून हे बडवे मंदिरातली आपली सर्वोच्च जागा अबाधित ठेवण्यासाठी पिढ्यान पिढ्या खोट्या नाट्या कथा कहाण्या रचुन रात्रंदिवस धडपडत होते. आमच्या वारकरी संप्रदायाच्या सगळ्या संतांनी वरील व्रत आणि मतांचा जोरदार धिक्कार केला. गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, कामकरी जनसामान्यांची भटा भिक्षुकांनी निर्माण केलेल्या खोट्या नाट्या कथा कहाण्या, व्रतवैकल्य, पूजा, विधि, दानदक्षिणेतून मुक्त करण्यासाठी नामस्मरणाचा सोपा मार्ग त्यांनी जनसामान्यांना सांगितला. *तुका म्हणे सोपी केली पायवाट* या तुकोक्तीनुसार ईश्वर प्राप्तीचा सगळ्यात सोपा मार्ग आमच्या वारकरी संप्रदायाच्या सगळ्या संतांनी सांगितला. 

             पंढरीची वारी इतकी साधी सोपी आणि सहज घडलेली घटना नव्हे. वारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या आधी इथल्या मनुवादी ब्राह्मणी धर्म व्यवस्थेने निर्माण केलेल्या क्रमवार विषमतेचा अर्थात वर्ण धर्माचा मूळ पायाच उखडून टाकणारी आमच्या वारकरी संप्रदायाच्या संतांनी केलेली सर्वोच्च समाजीक क्रांती होय. वर्ण धर्माने संपूर्ण मानव समूहाची कप्पेबंद विभागणी केली होती. नुसतं उच्चवर्णीय लोकांनाच जाती आणि वर्णाचा अभिमान होता असं नाही तर या वर्ण व्यवस्थेच्या शेवटच्या पायरीवर असणारा महार आणि त्याच्या वर असणारा जो मांग होता त्या मांगाला आपल्या वर किती लोक आहेत म्हणजे आपल्याला या व्यवस्थेने किती नीच ठरवले हे कळत नव्हतं. परंतु त्याला त्या महारापेक्षा मी श्रेष्ठ आहे याचा अभिमान होता. 

         इकडे पंढरीच्या वारीत मात्र वेगळचं चित्र होतं. *वर्ण अभिमान विसरली याती एक-एका लोटांगणी जाती* जिथे एखाद्या व्यक्तीच्या अंगाचा वारा आपल्याला शिवला तरी विटाळ होत असे. पण पंढरीच्या वारीमध्ये हेच लोक एकमेकाला लोटांगण घालत होते. एकमेकाला आलिंगन देत होते. *याती कुळ माझे गेले हरपोनी* ही अवस्था जनसामान्यांची झाली होती. वारकरी संप्रदायाच्या संतांच्या साहित्याने जनसामान्यांचे असे अंतर्बाह्य परिवर्तन घडवून आणले होते आणि म्हणून पंढरीची वारी म्हणजे इथल्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या मुस्काडात मारलेली जोरदार चपराक होय. पंढरीची वारी म्हणजे इथल्या जनसामान्यांनी बंधमुक्तीचे टाकलेले पहिले पाऊल होय. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम वारकरी संप्रदायाच्या संतांनी केलेल्या समाजक्रांतीची देण होय आणि म्हणून इथल्या ब्राह्मणी वर्ण धर्माचा पाया मुळासकट उखळून टाकणारी अमोघ साधना म्हणजे पंढरीची वारी होय. 

हेमंत टाले 9975807632

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या