• देवरी बिटातील प्रकार
• वनरक्षकाचा अफलातून कारभार
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324
भंडारा :- सहवनक्षेत्र किटाडी चे अधीनस्त देवरी बीट चे वनरक्षक नितीन पारधी यांनी रोपवनाचे खड्डे प्रतिखड्डा २५ रुपये याशिवाय पिण्याचे पाण्यासाठी ३ रुपये व साबर पजाई करिता ५ रुपये असा दर देऊन एका दिवशी सक्तीने १६ खड्डे मजुरांकडून खोदून घेतल्याचे उघडकीस आल्याने देवरी वनरक्षकाचा अफलातून कारभार चव्हाट्यावर आला आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी अड्याळ, सहवनक्षेत्र किटाडी चे अधीनस्त वनरक्षक बीट देवरी, लाखांदूर व लाखनी वनपरिक्षेत्राचे सीमावर्ती भागात असून मोठ्या झाडाचे पुरातन वनक्षेत्र म्हणून ख्याती प्राप्त होते. देवरी बीट चूलबंद नदीखोऱ्यात असल्यामुळे या ठिकाणी मौल्यवान वनसंपदा, फळझाडे व औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात होत्या. या वनक्षेत्रात हिंस्त्र श्वापदांसह तृणभक्षी प्राणी व सरपटणाऱ्या प्राण्यांचा अधिवास होता. त्यामुळे या वांक्षेत्रावर लाकूड तस्कर आणि शिकाऱ्यांचा शिरकाव झाल्याने वनक्षेत्र नावापुरतेच उरलेले आहे.
वनक्षेत्र वाढीसाठी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भंडारा चे उपवनसंरक्षक राहुल गवई यांनी देवरी वनरक्षक बीटात सरकारी पडीक जमिनीवर मिश्र रोपवन लागवडीकरीता मंजुरी प्रदान केली. हे मिश्र रोपवन १० हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात येणार असून त्यात अंदाजे ११ हजार १११ झाडांचे वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम ठोंबरे, क्षेत्र सहाय्यक एम. व्ही. श्यामकुवर यांचे मार्गदर्शनात वनरक्षक नितीन पारधी यांचे देखरेख व सनियंत्रणात मिश्र रोपवन लागवड करण्यात येणार आहे. त्याकरिता सर्वप्रथम मिश्र रोपवनचा जागेची मजुरांकर्वी साफसफाई करण्यात आली. त्यानंतर एप्रिल २०२३ मध्ये खड्डे खोदकाम करण्यात आले. खड्डे खोदकाम करणाऱ्या मजुरांची मजुरी प्रतिदिवस ४१३ रुपये असली तरी देवरी चे वनरक्षक नितीन पारधी यांनी २५ रुपये प्रतिखड्डा या प्रमाणे एका दिवशी १६ खड्ड्यांचे सक्तीने खोदकाम करून घेतल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर एका मजुराने सांगितले. तसेच पिण्याचे पाण्याकरिता ३ रुपये आणि साबर पजाईसाठी ५ रुपये देण्यात येणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. देवरी चे वनरक्षक नितीन पारधी यांनी प्रतीखड्डा २५ रुपये प्रमाणे सक्तीने खोदून घेण्याचे प्रयोजन काय ? या प्रकाराने बोगस मजुरांची नावे तर हजेरी पत्रकावर नाही ना ? असा प्रश्न निर्माण होतो. रोपवनासाठी साफसूफ केलेल्या जागेवर सध्या झुडपी जंगल उगवलेले आहे. त्यामुळे जागा साफसूफ केली का. असा संभ्रम निर्माण होतो. वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी देवरी वनरक्षक बीटातील रोपवन खड्डे कामाची चौकशी केल्यास सत्यता समोर येण्यास फार काळ लागणार नाही.


0 टिप्पण्या