• सानगडी पोलिस चौकीतील प्रकार
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324
भंडारा:-साकोली व लाखनी तालुक्याचे सीमावर्ती भागात असलेल्या सानगडी पोलिस चौकीच्या अधिनस्त १७ गावातील २५ हजार लोकसंख्येच्या संरक्षणाची जबाबदारी एकच पोलिस कर्मचाऱ्यावर असल्याने पोलिस चौकी कधीही बंद आणि कधीही सुरू असल्याने फिर्याद नोंदविण्यासाठी साकोली पोलिस ठाणे गाठवे लागते. या प्रकाराने वेळ आणि पैशाचा अपव्यय होतो. जनतेच्या सोयीचा विचार करून पोलिस चौकी सानगडी येथे आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करणे गरजेचे झाले आहे.
सानगडी पोलिस चौकीचे कार्यक्षेत्रात मिरेगाव, सोनमाळा, विहिरगाव(बु), सासरा, सानगडी, केसलवाडा, सानगाव, शिवणीबांध, साखरा, बोंडे, न्याहारवाणी, वटेटेकर, कटंगधरा, झाडगाव, पापडा(खु), सिरेगाव/टोला इत्यादी १७ गावांचा समावेश होतो. या गावातील लोकसंख्येच्या संरक्षणासाठी पोलिस उपनिरीक्षक १ सहाय्यक फौजदार १, पोलिस हवालदार २, पोलिस शिपाई २ अशी एकूण ६ पदे मंजूर आहेत. सानगडी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि कोका वन्यजीव अभयारण्याचे सीमेवर आहे. सानगाडीत सहानगढ हा पुरातन किल्ला व ऐतिहासिक बाऊली विहीर तसेच शिवणीबांध जलाशय असल्यामुळे पर्यटकांची वर्दळ असते. सानगडीवरूनच बालाघाट ते हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग गेल्यामुळे वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे अपघात केव्हा होईल याचा नेम नसतो. हा परिसर वन व्याप्त असल्याने अवैध व्यवसायासह कत्तलखाण्यात जाणारी जनावरे लपविण्यासाठी सुरक्षित स्थान आहे.
सानगडी पोलिस चौकीचे हद्दीतील अनेक गावात देशी दारूची वाहतूक व विक्री केली जाते. तसेच खुलेआम सट्टा व्यवसाय सुरू आहे. या आधी या पोलिस चौकीत ३ ते ४ पोलिस कर्मचारी कार्यरत होते. त्यामुळे अवैध व्यवसायावर काही प्रमाणात अंकुश होता. त्यातील काही सेवानिवृत्त झाले. तर काहींचे इतरत्र स्थानांतरण झाल्यामुळे एकच पोलिस कर्मचारी कार्यरत आहे. पोलिस विभागात मनुष्यबळाची कमतरतेमुळे या ठिकाणी अद्यापही पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली गेली नाही. ८ जून रोजी केसलवाडा येथील मंगेश प्रकाश खोब्रागडे(३२) हा अचानक बेपत्ता झाल्याने सानगडी पोलिस चौकी बंद असल्याने तक्रार देण्यासाठी रात्री ११:०० वाजता पोलिस ठाणे साकोली येथे जावे लागले. जनतेच्या सोयीचा विचार करून पोलिस चौकी सानगडी येथे आवश्यक त्या पोलिस कर्मचाऱ्यांची पदस्थापना करणे आवश्यक झाले आहे.


0 टिप्पण्या