• राज्यातील राजकीय घडामोडींचे पडसाद
• भाजपा व राष्ट्रवादी च्या ११ नगर सेवकांनी आणला अविश्वास
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324
भंडारा :-लाखनी येथील नगर पंचायतीचे उपाध्यक्ष तथा पाणी पुरवठा व जलनिस्सारण विषय समितीचे सभापती प्रदीप पुरुषोत्तम तीतिरमारे यांचेवर भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस च्या ११ नगर सेवकांच्या स्वाक्षऱ्यानिशी नगराध्यक्ष त्रिवेणी पोहरकर यांचेकडे अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला असून राज्यातील राजकीय घडामोडींचे पडसाद लाखनी शहरातही उमटल्याच्या चर्चेला पेव फुटले आहे.
१७ सदस्यीय लाखनी नगर पंचायतीची दुसरी सार्वत्रिक निवडणूक २०२२ मध्ये पार पडली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस ८, काँग्रेस २, भाजपा ६ व अपक्ष १ असे पक्षिय बलाबल होते. नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीसाठी राखीव होते. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस ची युती होऊन राष्ट्रवादी च्याच त्रिवेणी पोहरकर ह्या नगराध्यक्ष पदी तर काँग्रेस चे प्रदीप तीतिरमारे उपनगराध्यक्ष पदी विराजमान झाले. उपाध्यक्षाकडे पाणी पुरवठा व जलनिस्सारण विषय समिती सभापती पद देण्यात आले होते.
राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फुटीमुळे दुभंगून भाजपा सोबत सत्तेत सहभागी झाल्यामुळे त्याचे राज्यात सर्वदूर पडसाद उमटले. याचाच परिणाम लाखनी नगर पंचायतीवरही झाला. येथील नगर पंचायतीच्या भाजपा व राष्ट्रवादी च्या ११ नगर सेवकांनी सर्वसाधारण सभेत नगर सेवकासोबत गलिच्छ शब्दात व अरेरावीच्या भाषेत बोलणे, महिला नगर सेवकांसोबत अरेरावीच्या भाषा वापरणे, नगर पंचायती च्या नगराध्यक्ष महिला विराजमान असल्याने आपली मनमानी करणे व कामकाज करू देणार नाही. अशी धमकी देणे, दुसऱ्या प्रभागात जाऊन तेथील जनतेमध्ये इतर नगर सेवकाविषयी खोटारडेपणाचे कारण सांगणे, इतर प्रभागात विकास कामे चालू असताना त्या ठिकाणी कामाचे परसेंटेज हवे अन्यथा बील निघू देणार नाही अशी धमकी देणे या कारणामुळे उपनगराध्यक्ष प्रदीप तीतिरमारे यांचे विरुद्ध नगराध्यक्ष त्रिवेणी पोहरकर यांचेकडे अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला असून संदीप भांडारकर, महेश आकरे, आश्विन धरमसारे, लता रोडे, सविता सोनेकर, सारिका बसेशंकर, सचिन भैसारे, विभा हजारे, कांता निर्वाण, भूपेंद्र धरमसारे, निशा मोहनकर ह्या नगर सवेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. नगराध्यक्ष काय भूमिका घेतात. याकडे शहरातील जनतेचे लक्ष लागले आहे.


0 टिप्पण्या