भंडारा :-लाखनी येथील नगर पंचायतीचे उपाध्यक्ष तथा पाणी पुरवठा व जल निस्सारण विषय समितीचे सभापती प्रदीप पुरुषोत्तम तीतिरमारे यांचेवर भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस च्या ११ नगरसेवकांनी अविश्वास आणल्यामुळे नगराध्यक्ष त्रिवेणी पोहरकर यांनी २८ जुलै रोजी अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी विशेष सेभेचे आयोजन केले होते. तत्पूर्वीच उपनगराध्यक्ष प्रदीप तीतिरमारे यांनी २६ जुलै रोजी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने ते राजकीय व्यवस्थेचे बळी ठरल्याच्या शहरात चर्चा होत आहेत.
नगर पंचायत लाखनी ची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर २०२१ मध्ये पार पडली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस ८, काँग्रेस २, भाजपा ६, अपक्ष १ असे पक्षीय बलाबल होते. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ची युती होऊन नगराध्यक्ष पदी राष्ट्रवादी च्या त्रिवेणी पोहरकर तर काँग्रेस चे प्रदीप तीतिरमारे यांची उपनगराध्यक्ष पदी निवड करण्यात आली. राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फुटीमुळे दुभंगून भाजपा सोबत सत्तेत सहभागी झाल्याने सर्वदूर पडसाद उमटले. याचाच परिणाम लाखनी नगर पंचायत वरही झाला. भाजपा व राष्ट्रवादी च्या ११ नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष तथा पाणी पुरवठा व जल निस्सारण विषय समिती सभापती प्रदीप तीतिरमारे यांचे विरुद्ध अरेरावीची भाषा वापरणे, मनमानी कारभार करणे, नगरसेवकांबाबद अपशब्द बोलणे या कारणावरून नगराध्यक्ष त्रिवेणी पोहरकर यांचेकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला. यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी(ता.२८) रोजी नगर पंचायत सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. पण तत्पूर्वीच २६ जुलै रोजी प्रदीप तीतिरमारे यांनी उपनगराध्यक्ष पदाचा नगराध्यक्षाकडे राजीनामा दिला व नगराध्यक्षांनी मंजुरही केला. प्रदीप तीतिरमारे हे ४५७ अशा सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले होते. ते संयमी व मृदुभाषी, प्रभागातील जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारे नगरसेवक म्हणून ख्याती प्राप्त होते. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण अशी त्यांची कार्यप्रणाली असताना राज्यातील राजकीय घडामोडींचा त्यांना फटका सहन करावा लागला.


0 टिप्पण्या