कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324
भंडारा :- आद्रा नक्षत्राची सुरुवात पावसाने झाली त्यानंतर २६ व २७ जून रोजी अतिवृष्टीने पेरण्या खोडंबल्या होत्या. त्यानंतर पावसाने उसंत दिल्याने १० जुलै पर्यंत १६ हजार ९५७.८५ हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड करण्यात आली त्यात १६ हजार ६८०.९५ हेक्टर क्षेत्रात पऱ्हे(नर्सरी) तथा २७६.९० हेक्टर क्षेत्रात आवत्या धानाची लागवड करण्यात आली तर २७६.३० हेक्टर क्षेत्रात रोवणीही झाली. याशिवाय कडधान्य ४७७.९० हेक्टर, गळीत धान्य१.७० हेक्टर, ६६.४० हेक्टर, मसाला पिके १.५० हेक्टर, ऊस ५.४० हेक्टर, चारा पिके २ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आल्याचे तालुका कृषी अधिकारी यांचे पीक पेरणी अहवालात नमूद आहे.
तालुक्यात मोठा किंवा मध्यम सिंचन प्रकल्प अस्तित्वात नसल्यामुळे बहुतांश शेतजमीन कोरडवाहू होती. त्यामुळे धान उत्पादकांना नेहमीच दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागत असे. यावर मात करण्यासाठी अनेक अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांनी शासकीय योजनेतून सिंचन विहिरी तयार केल्या तर सधन शेतकऱ्यांनी शेतात खासगी बोअरवेलची व्यवस्था केल्याने सिंचन क्षेत्रात वाढ झाल्यामुळे रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेले असले तरी बहुतांश शेतकऱ्यांची पेरणी अटोपण्याच्या मार्गावर होती. पण २६ व २७ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीने कोरडवाहू शेतकऱ्यांनीही पेरणीस सुरुवात केली.
साकोली व लाखांदूर तालुक्याचे विभाजन करून लाखनी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. भौगोलिक क्षेत्र ३३ हजार १७३.३६ हेक्टर असून खरीप पिकाखालील क्षेत्र २० हजार ६९८.५६ हेक्टर आहे. खरीप हंगाम २०२३ मध्ये अन्यधान्य , कडधान्य , गळीतधान्य, भाजीपाला , मसाला पिके , ऊस , फळबाग, व चारा पिकांची लागवड केली जाते. खरीप हंगाम २०२३ मध्ये १० जुलै पर्यंत पऱ्हे (नर्सरी)१६ हजार ६८०.९५ हेक्टर क्षेत्रात आणि आवत्या २७६.९० हेक्टर क्षेत्रात अशी एकूण १६ हजार ९५८ हेक्टर क्षेत्रात पेरणी तर २७६.३० हेक्टर क्षेत्रात रोवणी झाली असल्याचे तालुका कृषी अधिकारी यांचे अहवालात नमूद आहे. असे पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी के. एन. चव्हाण , आर.एस.भांडारकर यांनी सांगितले.
*लाखनीत ३१७ मिमी पावसाची नोंद(चौकट)*
लाखनी तालुक्यात १ जून ते ११ जुलै पर्यंत सरासरी ३८८.८० मिलिमीटर पाऊस पडतो. मागील खरीप हंगामात याच कालावधीत ४४६.३० मिलिमीटर पाऊस पडला होता. खरीप हंगामात २०२३ मध्ये ३१७.१० मिलिमीटर पावसाची नोंद महसूल प्रशासनाने घेतली आहे. त्याची टक्केवारी ८२ टक्के आहे.


0 टिप्पण्या