Ticker

6/recent/ticker-posts

नऊ महिन्यापासून मानधन थकले, ग्रामीण गृह निर्माण अभियंता संपावर


• घरकुल लाभार्थ्यांना अडचण 
• तोडगा काढण्यास शासन उदासीन

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324

भंडारा :- तुटपुंज्या मानधनावर काम करणारा गृह निर्माण अभियंत्याचे मागील ९ महिन्यापासून मानधन थकले असल्यामुळे उपासमारीची वेळ आली असताना शासनाकडून कसलीही पाऊले उचलली गेली नसल्यामुळे गृह निर्माण अभियंता संपावर गेल्याने घरकुल लाभार्थ्यांची देयकासाठी अडचण होत आहे. शासनाने या गंभीर बाबीवर लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढणे गरजेचे झाले आहे. 
            २०२४ पर्यंत सर्वांना घरकुल या करिता शासन प्रयत्नशील असून मोडकळीस आलेल्या पडक्या व नादुरुस्त मातीचे घरात वास्तव्य करणाऱ्या, भाड्याचे घरात राहणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील व गरीब कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ दिला जातो. अनुसूचित जातीकरिता रमाई आवास योजना, अनुसूचित जमाती करिता शबरी आवास योजना तर इतरांसाठी प्रधानमंत्री आवास योजना राबविली जाते. ग्रामीण भागातील गरिबांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यात महत्त्वाचा वाटा असलेल्या केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजनेत कार्यरत ग्रामीण गृह निर्माण अभियंत्यांना डिसेंबर २०२२ पासून मानधन दिले गेले नाही. 
             ग्रामीण गृह निर्माण अभियंत्याकडून घरकुलाचे ले-आऊट देणे, बांधकाम सुरू असलेल्या घरकुलांना वेळोवेळी भेटी देऊन कामाचे जिओटॅगिंग करणे व फोटो अपलोड करणे, पात्र घरकुल लाभार्थ्यांची आवश्यक कागदपत्र गोळा करणे, मौका तपासणी करून घरकुल लाभार्थ्यांना मार्गदर्शन करणे, झालेल्या बांधकामानुसार हप्ता वितरित करणे, ज्या लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम सुरू केले नाही. अशांना बांधकामासाठी प्रोत्साहित करणे. इत्यादी कामे ग्रामीण गृह निर्माण अभियंत्यांना करावी लागतात. कामाचे मोबदल्यात शासनाकडून प्रती घरकुल टप्पेनिहाय पारिश्रमीक म्हणून मानधन दिले जाते. यावरच ते कार्यालयीन खर्च व कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. 
             जिल्ह्यात लाखनी, साकोली, लाखांदूर, भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी इत्यादी ७ पंचायत समितीत ८५ ग्रामीण गृह निर्माण अभियंते कार्यरत असून त्यांना मागील ८ ते ९ महिन्यापासून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून मानधन न मिळाल्याने त्यांचेसह कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. मानधन देण्यात यावे या करिता संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक यांना अनेकदा निवेदन देण्यात आले. पण काही उपयोग झाला नाही. त्यामुळे त्यांना नाईलाजाने आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला. ग्रामीण गृह निर्माण अभियंत्याचे संपामुळे सर्वच घरकुल योजनेचे लाभार्थी अडचणीत आले असल्याने शासनाने यावर सकारात्मक तोडगा काढणे आवश्यक झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या