• गोंडसावरी येथील घटना
• गावकऱ्यांत भीतीचे वातावरण
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324
भंडारा:- गोठ्यात पाळीव जनावरे का ओरडतात हे पाहण्यासाठी पशूपालक गेला असता दबा धरून बसलेल्या मादा बिबटाने पशू पालकावर हल्ला करून जखमी केल्याची घटना बुधवार(ता.१२) पहाटे ४:०० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. पशूपालकाचे नाव दुलीचंद नत्थू राऊत रा. गोंडसावरी, तालुका लाखनी असे आहे त्याचेवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून घटनेची माहिती मिळताच क्षेत्र सहाय्यक जितेंद्र बघेले, वनरक्षक त्रिवेणी गायधने यांनी भेट घेऊन पंचनामा केला. या घटनेमुळे गावकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेती परवडेनाशी झाल्यामुळे शेतीस पूरक व्यवसाय म्हणून पशूपालन केले जाते. दुलीचंद राऊत हे अल्पभूधारक असून त्यांचेकडे दुभती जनावरे आहेत. मंगळवारी रात्री चे सुमारास जनावरांना चारापाणी करून गोठ्यात बांधले व कुटुंबीयांसह जेवण करून झोपी गेले असता बुधवारी पहाटेच्या सुमारास गोठ्यातील जनावरांचा आरडाओरड ऐकू आल्याने काय झाले. म्हणून पाहण्यासाठी गेले असता २ पिल्लांसह दबा धरून बसलेल्या मादा बिबटाने हल्ला केल्याने त्यांचे पाठीवर बिबट्यांच्या नखाचे ओरखडे आले व ते जागेवरच पडले. सकाळी ७:०० वाजताच्या सुमारास वनसमिती अध्यक्ष महेश घरजारे यांनी क्षेत्र सहाय्यक जे.एम. बघेले यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी एस.पी. गोखले यांना कळवून वनरक्षक त्रिवेणी गायधने, सर्पमित्र मयूर गायधने यांना सोबत घेऊन क्षेत्र सहाय्यक जितेंद्र बघेले यांनी मौका पंचनामा केला. तसेच ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे जाऊन जखमी दुलीचंद राऊत यांची विचारपूस केली. तथा बयान नोंदविले. या घटनेमुळे गावकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोंडसावरी हे गाव कोका वन्यजीव अभियारण्याच्या बफरझोन मध्ये येत असल्यामुळे हिंस्त्र स्वापदांचा वावर आहे. सध्या शेत शिवारात पेरणी व रोवणी चे काम सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांसह मजूर दिवसभर शेतात असतात. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तत्काळ या मादा बिबटाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.


0 टिप्पण्या