Ticker

6/recent/ticker-posts

पावसाअभावी शेतजमिनीस पडल्या भेगा, रोवणी वाळण्याचे मार्गावर


• धान उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा
मो.9545914324

भंडारा :- मागील आठवडाभरापासुन पावसाने दडी मारली तथा कडक उनामुळे धान शेती संकटात आली आहे. रोवणीसाठी शेतकऱ्यांनी शेतातील साचलेले पाणी फोडून चिखलटी केली. पण रोवणी नंतर पाऊस न आल्याने शेतजमीनीस भेगा पडून धानपीक वाळण्याचे मार्गावर असल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. 
               साकोली व लाखांदूर तालुक्याचे विभाजन करून लाखनी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. १ नगरपंचायत व ७१ ग्रामपंचायतीत १०४ गावे समाविष्ट असून ९४ लोकवस्तीची तर १० गावे ही रीठी आहेत. लोकसंख्या १ लाख २१ हजार ५४५ , कुटुंबसंख्या २५ हजार ४९९ , दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची संख्या १७ हजार १४० , मजूर संख्या ६६ हजार ३६९ , भौगोलिक क्षेत्र ३३ हजार १७३.३६ हेक्टर तर भात पिकाखालील क्षेत्र २२ हजार २०७.७८ हेक्टर आहे त्यापैकी २१ हजार १६१.५ हेक्टर क्षेत्रात नर्सरी व ५३८.८० हेक्टर क्षेत्रात आवत्या धानाची लागवड करण्यात आली आहे. पैकी २० हजार ११० हेक्टर क्षेत्रात रोवणीही झाली आहे. 
             खरीप हंगाम २०२३ मध्ये पहिल्या २ नक्षत्रात पावसाने हुलकावणी दिली. त्यानंतर आद्रा नक्षत्राची सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने पेरणी करण्यात आली. पुनर्वसु व पुष्य नक्षत्राच्या समाधानकारक पावसामुळे जवळपास ९५ टक्के रोवणी करण्यात आली. आश्लेषा नक्षत्र पावसाने हुलकावणी दिल्यामुळे प्रखर उष्णतेमुळे रोवणी केलेल्या शेतजमिनीत भेगा पडल्या असून रोवणीही वाळण्याचे मार्गावर असल्याने धान उत्पादक शेतकरी चिंतातुर झाला आहे.

नेरला उपसा सिंचन चे पाणी सोडावे

तालुक्यात कोरडवाहू शेतजमीन अधिक आहे. सरासरीपेक्षा कमी पर्जन्यवृष्टी झाली असून उष्णतेच्या तीव्रतेमुळे धान पीक वाळण्याची शक्यता असल्यामुळे नेरला उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडल्यास धान पिकास संजीवनी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

प्रतिक्रिया
सालेभाटा परिसरात ६ तलाठी साज्यात २० ते २५ गावे समाविष्ट आहेत. खरीप हंगाम २०२३ मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून मागील आठवडाभरापासून पाऊस झाला नसल्यामुळे शेतजमीन कोरडी पडून भेगा पडलेल्या आहेत. 

गिरीश बावनकुळे, उपसभापती, प. स. लाखनी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या