Ticker

6/recent/ticker-posts

मन्यार नावाच्या सर्पाने झोपेतच केला दंश, ११ वर्षीय मोनालीचा दुर्दैवी मृत्यू.

६ व्या वर्गात शिकत असलेली मोनाली वर्गात होती हुशार. सर्पदंशाने हरपले प्राण.

भवन लिल्हारे कार्यकारी संपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो.नं.9373472847

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात मौजा नवरगाव येथे मध्य रात्रीच्या वेळेस मण्यार सर्पाच्या दंशाने हृदयद्रावक घटना घडली आहे. 
सविस्तर असे की, कुटुंबीयांसह रात्री जेवण करून घरात आईच्या कुशीत गाढ झोपलेल्या ११ वर्षीय मुलीला झोपेतच सापाने चावा घेतला. यानंतर उपचारासाठी तातडीने भंडारा आणि नागपूर गाठूनही अखेर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना तुमसर तालुक्यातील नवरगाव येथे ३ ऑगस्टच्या मध्यरात्री घडली.
मोनाली श्रीधर गुर्वे असे या मृतक मुलीचे नाव आहे. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत ती ६ व्या वर्गात शिकायची. ३ ऑगस्ट २०२३ च्या रात्री आई-वडील आणि भावंडांसोबत जेवण करून सर्वजण झोपी गेले होते. आई आणि तीन मुली जमिनीवर अंथरूण घालून झोपल्या होत्या. दरम्यान, रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सापाने कडाडून चावा घेतल्याने मोनाली ओरडायला लागली. यामुळे कुटुंबीय जागे झाले. यावेळी पाहिले असता मण्यार या अतिविषारी सापाने तिला चावा घेतल्याचे लक्षात आले.
जराही वेळ न घालवता आई-वडिलांनी मोनालीला तुमसर येथील शासकीय दवाखान्यात आणले. मात्र, प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला भंडारा जिल्हा रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले. प्रकृती अधिकच खालावत चालल्याने तिला डॉक्टरांच्या सल्लानुसार पहाटे नागपूर येथील रुग्णालयामध्ये नेण्यात आले. मात्र, तिथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
*मोनाली ६ व्या वर्गात होती हुशार
सहाव्या वर्गात शिकणारी मोनाली वर्गातील हुशार विद्यार्थिनी होती. तिच्या पश्चात एक भाऊ व तीन बहिणी आहेत. गोंडस आणि सालस स्वभावाच्या मोनालीच्या अकाली मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. शुक्रवारी दुपारी गावच्या स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या