• जांभळी येथील घटना
• पशुपालकात भीतीचे वातावरण
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा
मो.9545914324
भंडारा :-लाखनी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणाऱ्या नियतक्षेत्र जांभळी येथे गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याने शेळी ठार झाल्याची घटना गुरुवारी(ता.३) रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. महिला पशुपालकाचे नाव शिल्पा तस्मिर अन्सारी(३५) रा. जांभळी असे असून त्याचे अंदाजे ५ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती वनविभागास देण्यात आली असली तरी पशूपालकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिल्पा अन्सारी हे अल्पभूधारक शेतकरी असून शेतीस पूरक व्यवसाय म्हणून शेळी पालनाचा व्यवसाय करतात. गुरुवारी रात्री घरच्या पाळीव प्राण्यांना चारापाणी करून गोठ्यात बांधले व कुटुंबीयांसह ती झोपी गेली. पहाटेच्या सुमारास अचानक गोठ्यात शिरून बिबटाने हल्ला केल्याने शेळ्यांनी आरडा- ओरड केली असता झोपमोड झाल्यामुळे पशूपालक महिलेने गोठ्यात जाऊन पाहिले असता एक शेळी मृतावस्थेत आढळून आली. घटनेची माहिती पोलिस वन विभागाला देण्यात आली. क्षेत्र सहाय्यक एस.बी. उईके, वनरक्षक के. एस. वंजारी घटनास्थळी गेले व मृत शेळीचा पंचनामा करून पशुधन विकास अधिकाऱ्याला माहिती दिली. महिला पशुपालकाचे ५ हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. मृत शेळीचे शवविच्छेदन करून शेळीचा मृतदेह जमिनीत पुरण्यात आला. या घटनेमुळे पशुपालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वन विभागाकडून पशू पालकांना आवाहन
पावसाळ्यामुळे वनक्षेत्र घनदाट झाल्याने वन्यप्राणी रात्रीचे वेळी गावालगत वास्तव्यास येतात. त्यामुळे पशू पालकांनी रात्री शेकोट्या पेटवून किंवा लाईट सुरू ठेवून पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी. हिंस्त्र प्राणी दिसल्यास वन विभागाला कळविण्याचे आवाहन केले आहे.


0 टिप्पण्या