Ticker

6/recent/ticker-posts

गाळाची माती व शेणखतावीणा रोपांची लागवड सुरू..!

• वाकल मिश्र रोप वनातील प्रकार

• वनरक्षकाचा अफलातून कारभार

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा
मो.9545914324

भंडारा:- पर्यावरणाचा समतोल राखण्यास शासन कटिबद्ध असून वृक्ष लागवड आणि संवर्धनास प्राथमिकता दिली जाते. पण वन विभागातील काही भ्रष्ट लोकसेवकांमुळे शासनाची उद्देशपूर्ती होत नसल्याचा प्रत्यय सहवनक्षेत्र किटाडी चे अधीनस्त वनरक्षक बीट देवरी अंतर्गत नियतक्षेत्र वाकल येथे आला. मिश्र रोपवन लागवड करतांना गाळाची माती व शेणखतावीणाच रोपांची लागवड सुरू असल्याचा अफलातून प्रकार उघडकीस आला आहे. वन अधिकारी या वनरक्षकावर काय कारवाई करतात. याकडे ग्रामवासीयांचे लक्ष लागले आहे.   
               अवैध वृक्ष तोडीने पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचे मार्गावर आहे. त्यामुळे कधी अवर्षन तर कधी अतिवृष्टीमुळे दुष्काळाचे सावट असते. यावर रामबान उपाय वृक्ष लागवड आणि संवर्धन असल्याचे शासनाचे निदर्शनास आल्याने अनेक योजनांचे माध्यमातून आवश्यक तो निधी उपलब्ध करून वृक्ष लागवड करण्याच्या सूचना वन विभागास निर्गमित करण्यात आल्या आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी अड्याळ, सहवनक्षेत्र किटाडी, वनरक्षक बीट देवरी, नियतक्षेत्र वाकल येथील वन विभागाचे अखत्यारीतील शासकीय झुडपी जंगल व पडीत जागेत आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये १० हेक्टर जागेत मिश्र रोपवन लागवडीचे नियोजन करण्यात आले.  
              प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर मेंढे यांचे मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक मुकेश श्यामकुवर, वनरक्षक नितीन पारधी यांचे सनियंत्रण व देखरेखीखाली १० हेक्टर क्षेत्रात ११ हजार ११० रोपांची लागवड करणे सुरू आहे. त्यात हिरडा, बेहळा, सागवान, जांभूळ यासारख्या १० प्रजातींच्या वृक्षांची लागवड करणे सुरू आहे. वनरक्षक नंदेश्वर हटवार, वनरक्षक रंगारी मॅडम यांच्या देखरेखीखाली स्थानिक मजूर कामावर आहेत. खड्डे बुजवितांना गाळाची माती व शेणखत आणि त्यानंतर रोपांची लागवड केली जाते. पण वाकल येथील मिश्र रोपवनाची लागवड करतांना गाळाची माती व शेणखताचा उपयोग केला गेला नसल्याचे नाव न छापण्याचे अटीवर एका मजुरांने सांगितले. या प्रकाराने मुदतीत झाडाची वाढ होईल का ? असा प्रश्न निर्माण होत असून वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी वाकल मिश्र रोपवनाची चौकशी करून मिश्र रोपवन लागवडीत हयगय करणाऱ्या क्षेत्र सहाय्यक, वनरक्षकावर कारवाई करणे गरजेचे झाले आहे. 


माहिती व सूचना फलक नाही

शासकीय योजनेअंतर्गत केलेल्या विकास कामाची जनतेला माहिती व्हावी. याकरिता विकास कामाचे ठिकाणी माहिती व सूचना फलक लावण्याच्या शासनाच्या मार्गदर्शक सूचना असून त्यावर योजनेचे नाव, अंदाजपत्रकिय रक्कम, आर्थिक वर्ष, काम करण्याऱ्या यंत्रणेचे नाव , ढोबळ नकाशा, दोन रोपांमधील अंतर याबाबद माहिती असणे बंधनकारक असले तरी वाकल येथील मिश्र रोपवनाचे जागेत दर्शनी भागात माहिती व सूचना फलक लावलेला नाही.


प्रतिक्रिया

वनरक्षक बीट देवरी चे अधीनस्त नियतक्षेत्र वाकल येथे १० हेक्टर जागेत मिश्र रोपवन लागवडीचे काम सुरू आहे. अंदाजपत्रकात गाळाची माती व शेणखताचा समावेश नसल्यामुळे मिश्र रोपवन लागवडीपूर्वी उपयोग करण्यात आला नाही. 

मुकेश श्यामकुवर, क्षेत्र सहाय्यक, कीटाडी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या