Ticker

6/recent/ticker-posts

मोबाईल शॉपी फोडणारा चोरटा ८ तासांत गजाआड...!

• पोहरा येथील घटना 

• लाखनी पोलिसांची कामगिरी

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324

भंडारा :- मोबाईल शॉपी चे शटरला लावलेले कुलूप अज्ञात चोराने आरीने कापून दुकानातील ३ मोबाईल, मेमरी कार्ड, हेडफोन, स्मार्ट वॉच व नगदी ५०० असा एकूण ८ हजार ९०० रुपयाचे मुद्देमाल चोरून नेल्याची घटना गुरूवारी(ता.२८) चे सकाळी ९:०० वाजता उघडकीस आली होती. मोबाईल शॉपी मालकाचे फिर्यादी वरून तांत्रिक तपास व सीसीटिव्ही फुटेज चे आधारे अवघ्या ८ तासांत चोरास गजाआड करण्यात लाखनी पोलिसांना यश आले. आरोपीचे नाव नीकेश सुभाष मटाले(२३) रा. तावशी, ता. लाखांदूर असे आहे. पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू असून या कारवाईने लाखनी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
             गणेश कावळे(२७) रा. न्याहारवानी यांचे मौजा पोहरा येथे मागील ५ वर्षापासून मोबाईल शॉपी चे दुकान आहे. त्यातून मोबाईल, हेडफोन, बॅटरी, मेमरी कार्ड असे मोबाईल संबंधी सामानाची विक्री केली जाते. बुधवारी(ता.२७) रात्री ७:०० वाजता दुकान बंद करून ते गावी गेले. गुरुवारी सकाळी ९:०० वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाचे शटरला लावलेले कुलूप फेकलेले तथा शटर बंद होते. शटर उघडून पाहिले असता दुकानातील ३ मोबाईल ३ हजार रुपये(२ कार्बन व १ सॅमसंग कंपनीचा) , अँड्रॉइड जुना मोबाईल किंमत २ हजार, चॅनल कम्पनीचे ६ मेमरी कार्ड १ हजार ८०० रुपये, युबॉन कंपनीचे २ हेडफोन २०० रुपये, २ स्मार्ट वॉच १ हजार ४०० रुपये आणि गल्ल्यातील नगदी ५०० असा एकूण ८ हजार ९०० रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले. पण गावात गणपती विसर्जन असल्याने उशिरा तक्रार देण्यात आली. लाखनी पोलिसांनी अपराध क्रमांक ३४७/२०२३ कलम ४५७, ३८० भादवि अन्वये गुन्हा दाखल करून तपासात घेतला.
              घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष चीलांगे, पोलिस हवालदार सुभाष राठोड, दिगंबर तलमले, सुरेश आत्राम, पोलिस शिपाई क्रांतिश कराडे यांचे पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तथा तांत्रिक तपास आणि सीसीटिव्ही फुटेज ची तपासणी केली असता एक युवक संशयास्पद स्थितीत दिसून आल्याने त्याचेवर संशय बळावला. पोलिसांनी त्याचेविषयी माहिती गोळा केली असता तो चोर असल्याचे दिसून आल्याने अवघ्या ८ तासांत त्याचे घरून त्याला शुक्रवारी पहाटे ३:३० वाजता अटक करण्यात आली. चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी त्याची पोलिस कोठडी घेण्यात येणार असल्याचे विश्वसनीय वृत्त असून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार दिगंबर तलमले तपास करीत आहेत. या कारवाईने लाखनी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या