रुपाली मेश्राम कार्य. संपादिका मो.9552073515
नागपूर: राज्यात २७ व २८ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानाची भरपाई पात्र शेतकऱ्यांना अदा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली. शासनाच्या महसूल व कृषी यंत्रणेने नुकसानीचे पंचनामे करीत विसाव्या दिवशीच पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई डीबीटी प्रणालीनुसार अदा करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज पात्र शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात धनादेशांचे वितरण करून करण्यात आली.
राज्यात २७ व २८ नोव्हेंबर रोजी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यात शेतकऱ्यांच्या विविध पिकांचे नुकसान झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार महसूल व कृषी विभागाने जलदगतीने कार्यवाही करीत नुकसानाचे पंचनामे करून तसा अहवाल राज्य शासनाला सादर केला. त्यानुसार राज्य शासनानेही तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मंजूर केली. ही रक्कम आजपासून अदा करण्यास सुरवात झाली. याबाबतचा प्रातिनिधीक स्वरूपाचा कार्यक्रम आज विधानभवनाच्या आवारातील मंत्रिमंडळ कक्षात झाला. यावेळी नागपूर जिल्ह्यातील मौदा व पारशिवनी तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात धनादेश वितरीत करण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण व संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे (सार्वजनिक उपक्रम), राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, आमदार भरत गोगावले, आमदार योगेश कदम, मुख्य सचिव मनोज सौनिक, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांच्यासह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते गोविंद गोपाळ डांगरे (२१६००), रागे सदाशिव आकारे (१८९००), सूर्यभान विठोबा डांगरे (१८९००), श्रीकांत जागो किरपान (२१६००), अंकित मनोहर चामर (६८००), धर्माप्पा नागो तेलंगराव (२०५००), शरद किरपान (१०८००), श्रीनिवास देवनीनी (३७८००), नथू चाकोले (२१६००), कवडू नाकोले (८१०००), प्रभाकर नागपुरे (८१०००) आदी शेतकऱ्यांना भरपाईचे धनादेश प्रदान करण्यात आले.


0 टिप्पण्या