रामाक्र ५३ मुरमाडी येथील घटना
कार चालकावर गुन्हा दाखल
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा :-लाखनी शहरातील उड्डाण पुलाखाली भंडारा कडून साकोलीकडे जाणारी भरधाव कार महामार्गाच्या कडेला असलेल्या डीवायडर वर चढून पलटी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ११:१५ वाजताच्या दरम्यान घडली. यात १ इसम गंभीर जखमी झाला असून उर्वरित २ किरकोळ जखमी झाले आहेत. अमृत किसन दिवाळे(५०) रा. आमगाव जि. गोंदिया असे गंभीर जखमीचे तर अनुज अग्रवाल(३०) व भारत ब्रिजलाल गायधने दोघेही रा. आमगाव, जिल्हा गोंदिया अशी किरकोळ जखमीची नावे आहेत. लाखनी पोलिसांनी कार चालकावर गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनात तपास सुरु आहे.
अनुज अग्रवाल हे भारत गायधने व अमृत दिवाळे यांच्यासह टाटा टियागो कार क्र. एमएच ३५ एजी ३४०४ ने भंडारा कडून साकोली कडे भरधाव वेगाने जात असताना उड्डाण पुलाचे पिल्लर क्रमांक ५१ व ५२ च्या दरम्यान असलेल्या डीवायडरवर कार चढल्याने अनियंत्रित होऊन पलटी झाली. घटनास्थळावरील नागरिकांनी घटनेची माहिती लाखनी पोलिसांना दिली. लाखनी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष चीलांगे व गडेगाव महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोदकुमार बघेले आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये फसलेल्या जखमींना नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले व उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले. अमृत दिवाळे यांच्या खांद्याला व उजव्या डोळ्याच्या वर दुखापत झाल्याने प्रथमोपचार करून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. लाखनी पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष चीलांगे यांच्या फिर्यादीवरून कार चालक अनुज अग्रवाल यांच्याविरुद्ध अपराध क्रमांक ४१५/२०२३ कलम २७९, ३३७ भादवी तथा मोटारवाहन कायद्य कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस नायक राजेश बांते तपास करीत आहेत.


0 टिप्पण्या