• गडेगाव एमआयडीसी तील प्रकार, वन विभाग अनभिज्ञ
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:- राजेगाव, गडेगाव एमआयडीसी तील एका मॅग्नीज ऑक्साईड व मॅग्नीज डायऑक्साईड कंपनीत वनपरिक्षेत्र अधिकारी भंडारा चे आशीर्वादाने विना टी.पी. चे लाकडाचा सर्रास वापर सुरू असला तरी स्थानिक वन कर्मचारी मुग गिळून गप्प आहेत. यात जलावू व लठ्ठा प्रकारचे लाकूड वापरण्यात येते. हा नियमबाह्य प्रकार असल्याने यात मोठे अर्थकारण दडले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी नियमानुसार लाकूड खरेदी करण्याची कंपनी मालकास समज देण्याची मागणी होत आहे.
गडेगाव येथे ट्रक तयार करणारा अशोक लेलँड कंपनीचा कारखाना असल्यामुळे या कारखान्यास लागणारे सुटे भाग तसेच इतरही उद्योग जिल्ह्यात यावे. या करिता गडेगाव, राजेगाव येथे औद्योगिक इंडस्ट्रियल एरिया(एमआयडीसी) स्थापन करण्यात आली. या पासून परिसरातील हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या इंडस्ट्रियल एरियात एक मॅग्नीज ऑक्साईड व मॅग्नीज डायऑक्साईड प्रकल्प असून मॅग्नीज वितळविण्यासाठी या प्रकल्पाला शेकडो टन लाकडाची आवश्यकता असते. तुमसर चे एका लाकूड व्यवसायिकाकडून या कंपनीला जलावू व लठ्ठा ह्या प्रकारात लाकूड पुरवठा केला जातो. त्यात अर्ध्यापेक्षा जास्त विना टी.पी. चा लाकूड पुरवठा केला जात असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. या बाबद अनेक वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती असली तरी हेतू पुरस्पर दुर्लक्ष केले जात असल्याचे समजते.
ही कंपनी वनपरिक्षेत्र अधिकारी भंडारा अंतर्गत सहवनक्षेत्र माडगी चे अखत्यारीत येत असून हा गोरखधंदा मागील अनेक वर्षापासून सुरू असला तरी स्थानिक वन कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास का आला नाही ? किंवा याकडे अर्थकारणामुळे हेतू पुरस्पर दुर्लक्ष केले जाते का ? असा प्रश्न निर्माण होत आहे. ही गंभीर बाब परिसरातील अनेक गावात माहिती असताना वन विभाग अनभिज्ञ कसा ? यात कुठे तरी पाणी मुरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमसर वरून विना टी.पी. चा लाकूड एमआयडीसी राजेगाव पर्यंत पोहचातांना अनेक वन परिक्षेत्र पार करावे लागतात. पण ही लाकूड तस्करी कुणाच्याही निदर्शनास कशी आली नाही. हा संशोधनाचा विषय असून लाकूड पुरवठादार व वन अधिकाऱ्यांत साडेलोटे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे स्वतः लक्ष घालून या कंपनीत नेमका काय प्रकार चालतो. याची चौकशी करून सत्यता जनते पुढे आणणे आवश्यक झाले आहे.
0 टिप्पण्या