Ticker

6/recent/ticker-posts

सिमेंट रस्ता तयार न करता निधीची उचल करून शासनाची फसवणूक

• सावरी/मुरमाडी ग्रामपंचायतीमधील प्रकार 

• सामाजिक कार्यकर्त्या मंदा गभने यांचा आरोप 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज 

भंडारा :-लाखनी तालुक्यातील सावरी/मुरमाडी ग्रामपंचायतीत १३वा वित्त आयोग पंचायत समिती स्तर अंतर्गत २०१४-१५ या आर्थिक वर्षात ३ लाख ७० हजार रुपये अंदाजपत्रकिय रकमेच्या ११३ मीटर सिमेंट काँक्रिट रस्त्यास मंजुरी प्रदान करण्यात आली होती. त्यापैकी ४७ मीटर रस्ता तयार न करताच निधीची उचल करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या मंदा गभने यांनी केला असून यात लिप्त पदाधिकारी व लोकसेवक यांनी शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. या करिता गटविकास अधिकारी पंचायत समिती लाखनी यांचेकडे तक्रार केली आहे. गट विकास अधिकाऱ्याकडून काय कारवाई केली जाते. याकडे ग्रामवासी जनतेचे लक्ष लागले आहे. 
              ग्रामपंचायत सावरी/मुरमाडी येथील तत्कालीन ग्रामपंचायत कमिटीने ठरावा प्रमाणे कार्तिक तुमसरे ते केवळराम दिघोरे, सुरेश खांडेकर ते आनंदराव धांडे यांचे घरापर्यंत ११३ मीटर सिमेंट रस्ता बांधकाम केल्याचे तत्कालीन अभियंता यांनी मोजमाप पुस्तिकेत नमूद केले असून त्यावर ३ लाख ७० हजार रुपये खर्च झाल्याचे ३१ मार्च २०१५ ला दर्शवण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्ष मौका चौकशी केली असता केवळराम दिघोरे यांचे घरापर्यंत २० मीटर, सुरेश खांडेकर ते आनंदराव धांडे यांचे घरापर्यंत ४६ मीटर असा एकूण ६६ मीटर सिमेंट रस्ता बांधकाम करण्यात आला आहे. पण सुरेश खांडेकर ते आनंदराव धांडे यांचे घरापर्यंत दुसरा कोणताच रस्ता नसतांना एकाच नावाने २ रस्ते दर्शवून ४७ मीटर खोटे सिमेंट रस्ता बांधकाम केले असल्याचे दाखविण्यात आल्याचे सामाजिक कार्यकर्त्या मंदा गभने यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती लाखनी यांचेकडे दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. एकूण ११३ मीटर सिमेंट रस्ता बांधकाम करायचे असताना तत्कालीन कमिटीने आपले पदाचा दुरुपयोग करून जवळच्यांना फायदा पोहचविण्याकरिता सावरी/मुरमाडी येथील आबादी जागेतील गट क्रमांक १६४/३ मधील प्लॉट धारकांच्या प्लॉट मधील जागेला शासकीय रस्ता दाखवून १३वा वित्त आयोग पंचायत समिती स्तर अंतर्गत २०१५ मध्ये त्या अतिक्रमण केलेल्या खासगी जागेवर पक्का सिमेंट रस्ता तयार केला. तसेच मोजमाप पुस्तिकेत एकूण ११३ मीटर लांब सिमेंट रस्ता तयार केल्याचे दर्शवण्यात आले. मात्र मौक्यावर फक्त ६६ मीटर बांधकाम करून उर्वरित ४७ मीटर सिमेंट रस्ता तयार न करता निधीची उचल करून खोटे बिल व मजूर तथा साहित्य खरेदी केल्याची देयके जोडून त्यावर शासनाचा बेकायदेशीरपणे निधी खर्च केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता मंदा गभने यांनी केला आहे. यात तत्कालीन ग्रामपंचायत कमिटी, ग्रामसेवक, अभियंता व साहित्य पुरवठादार यांनी संगनमत करून सिमेंट रस्ता बांधकाम पूर्ण केले नसतांनाही झाल्याचे दर्शवून शासकीय निधीचा दुरुपयोग करून भ्रष्टाचार केला असल्याने जनतेसह शासनाची फसवणूक केल्याने बेकायदेशीर खर्च केलेली रक्कम व्याजासह वसूल करून तत्कालीन ग्रामसेवक, ग्रामपंचायत कमिटी व अभियंता यांचे विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी गटविकास अधिकारी पंचायत समिती लाखनी यांचेकडे तक्रार केली आहे. काय कारवाई केली जाते. याकडे ग्रामवासी जनतेचे लक्ष लागले आहे. 
*प्रशासकीय मंजुरी आधीच काम पूर्ण(चौकट)*
ग्रामपंचायत सावरी/मुरमाडी येथे १३वा वित्त आयोग पंचायत समिती स्तर अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्त्यास २३ मे २०१५ ला प्रशासकिय मान्यता देण्यात आली. साहित्य २७ मे २०१५ ला खरेदी करण्यात आले. पण २० एप्रिल २०१५ ते २६ एप्रिल २०१५ व १ मे २०१५ ते १६ मे २०१५ तसेच १८ मे २०१५ ते २५ मे २०१५ या कालावधीत काम झाल्याचे दर्शवण्यात आल्याने प्रशासकीय मान्यतेपुर्वीच सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम सुरू झाल्याचे दिसून येते. 
*बाजारभावापेक्षा अधिक दराने साहित्य खरेदी(चौकट)*
२०१५ मध्ये खुल्या बाजारात सिमेंट चे दर २५० रुपये प्रति बॅग असले तरी ग्रामपंचायत सावरी ने सिमेंट काँक्रिट रस्त्यासाठी ३५० रुपये प्रति बॅग सिमेंट तसेच ८ मिलिमीटर जाळीची सळाख(लोहा) ३० रुपये प्रति किलो ग्रॅम बाजारभाव असताना तत्कालीन ग्रामपंचायत कमिटीने ४६ रुपये ५० पैसे प्रति किलो ग्रॅम सळाख(लोहा) विकत घेतल्याचे मोजमाप पुस्तिकेत नमूद असल्यामुळे बाजारभावापेक्षा अधिक दराने साहित्य खरेदी करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या