Ticker

6/recent/ticker-posts

बारावीच्या निकालात जि.प. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सरशी


विज्ञान व कला विभागात जि प चे विद्यार्थी तालुक्यात अव्वल

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज 
भंडारा :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा द्वारा शैक्षणिक सत्र २०२३-२४  मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत कला व विज्ञान शाखेमध्ये तालुक्यातील २ वेगवेगळ्या जिल्हा परिषदेच्या हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील २ विद्यार्थ्यांनी अव्वल स्थान प्राप्त करून बाजी मारल्याची माहिती लाखांदूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तत्त्वराज अंबादे यांनी दिली आहे.
                   फेब्रुवारी- मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळांतर्गत इयत्ता बारावीची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेत लाखांदूर तालुक्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयाच्या विविध शाखे अंतर्गत तब्बल १ हजार ५६८ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी १ हजार ५६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेचे २१ मे रोजी निकाल घोषित करण्यात आले. यामध्ये विज्ञान शाखेंतर्गत स्थानिक लाखांदूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाची नयना मधुकर ढोरे नामक विद्यार्थिनीने ८६.८३ टक्के गुण प्राप्त करीत तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकविला. तर कला शाखे अंतर्गत सरांडी/बु. येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या करिष्मा पुंडलिक मावळे नामक विद्यार्थिनीने ८७.१७ टक्के गुण प्राप्त करून तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळविला. 
                   विज्ञान शाखेअंतर्गत मासळ येथील सुबोध विद्यालयाची शिवानी प्रमोद राऊत या विद्यार्थिनीने ८३.१७ टक्के गुण प्राप्त करीत द्वितीय तर स्थानिक लाखांदूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या दिव्यांशी हितेंद्र दखणे नामक विद्यार्थिनीने ८३ टक्के गुण प्राप्त करीत तालुक्यातून तृतीय क्रमांक प्राप्त केले आहे. तर कला शाखे अंतर्गत तालुक्यातील सरांडी/बु. येथील जि. प. हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाची प्राजक्ता मुनेश्वर ठाकरे नामक विद्यार्थिनी ने ८३.१७ टक्के गुण प्राप्त करीत द्वितीय व स्थानिक लाखांदूर येथील जि प हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या लेश्मा रवीसिंग बघेल नामक विद्यार्थिनीने ८१.१७ टक्के गुण प्राप्त करीत तालुक्यातून तृतीय क्रमांकाने येण्याचा मान पटकविला.
                  २१ मे रोजी दुपारी १:०० वाजताच्या सुमारास बारावीचा निकाल घोषित होताच तालुक्यातून विज्ञान विभागातून प्रथम आलेल्या नयना मधुकर ढोरे या विद्यार्थिनीचे अभिनंदन करण्यासाठी लाखांदूर पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे अधिकारी तिच्या घरी पोहोचले. यावेळी गटशिक्षणाधिकारी तत्वराज अंबादे, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी भगवान वरवटे, काशिनाथ दिवठे, दयाल भोवते यांनी नयनाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
*विज्ञान शाखेच्या ८ महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल* 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा द्वारा घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखे अंतर्गत तालुक्यातील विविध ८ कनिष्ठ महाविद्यालयातील १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या महाविद्यालयांमध्ये स्थानिक लाखांदूर येथील जि प हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, सिद्धार्थ कनिष्ठ महाविद्यालय, डॉ बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय, सेवकभाऊ कनिष्ठ महाविद्यालय, दिघोरी मोठी येथील जि.प. हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, बारव्हा येथील शशिकांत दैठणकर कनिष्ठ महाविद्यालय, मासळ येथील सुबोध विद्यालय व कऱ्हांडला येथील आयुष इंग्लिश स्कूल आदी विद्यालयांचा समावेश आहे. तथापि इयत्ता बारावीच्या परीक्षेत तालुक्यातील जि प कनिष्ठ महाविद्यालयासह अन्य खाजगी विद्यालयांतर्गत तालुक्यातील ९३.२३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याने गटशिक्षणाधिकारी तत्वराज अंबादे यांनी आनंद व्यक्त करीत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या