Ticker

6/recent/ticker-posts

मुरमाडी/तूप आणि परिसर अवैध धंद्याचे हब

• सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे अक्षम्य दुर्लक्ष

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज 

 भंडारा:-लाखनी तालुक्यातील पालांदूर पोलिस ठाण्याचे हद्दीत येणाऱ्या मुरमाडी/तूप आणि परिसरातील अनेक गावात अवैध देशी व मोहफुलाची दारू विक्री तथा सट्टा व्यवसाय खुलेआम सुरू असल्यामुळे किशोरवयीन मुले व्यसनाधीन होण्याचे मार्गावर आहेत. तर सायंकाळ नंतर मद्यपींच्या त्रासापाई आवश्यक कामाकरीता महिलांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. चूलबंद नदिखोऱ्यातील भूगाव रेती घाटातून अवैध रेती वाहतूक सुरू असल्याने मुरमाडी/तूप परिसर अवैध व्यवसायाचे हब झाले आहे. 
             चुलबंद नदिखोऱ्यात वसलेल्या मुरमाडी/तूप आणि परिसरात अल्प, अत्यल्प शेतकरी व भूमिहीन शेतमजुरांची संख्या अधिक असल्यामुळे दिवसभर काबाडकष्ट करून रात्री मद्य प्राशनाची सवय आहे. पण परवानाधारक दारू दुकान नसल्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांचा आश्रय घ्यावा लागतो. हे दारू विक्रेते पिंपळगाव/सडक किंवा पालांदूर वरून देशी दारूची वाहतूक करून गावात अधिक दराने विक्री करतात. बेरोजगारांची संख्या अधिक असल्याने ते किशोरवयीन मुलांसह व्यसनाधीन होण्याचे मार्गावर असल्यामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. सायंकाळचे सुमारास दारू विक्रेत्यांचे घराजवळ मद्यपींच्या गर्दीमुळे आवश्यक कामासाठीही महिलांना बाहेर जाता येत नाही. कमी श्रमात लखपती होण्याचे हव्यासापोटी श्रमिकापासून तर लोकसेवक व महिला अवैध सट्टयाचे आहारी गेलेल्या असून उद्या कोणती ओपन येईल. याची आकडेमोड करीत असल्यामुळे कुटुंब प्रमुखांचे कामधंद्याकडे लक्ष नसल्याने अनेक कुटुंबांची वाताहत झाली आहे. भूगाव नदी घाटातून अवैध रेती वाहतूक सुरू असून भरधाव रेती वाहतूक करणाऱ्या वीणा क्रमांकाच्या ट्रॅक्टर ने धडक दिल्याने अनेक अपघात होऊन काहींना आपला जीव गमवावा लागला. तर अनेक जखमी झाले. या प्रकाराने मुरमाडी/तूप आणि परिसर अवैध धंद्याचे माहेरघर झाले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष पुरवून अवैध व्यवसायाचे उच्चाटन करावे. अशी मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या