• पालांदूर व मुरमाडी/तूप शेतशिवारातील प्रकार
• विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातील अभियंत्याचे दुर्लक्ष
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:- धान उत्पादक शेतकऱ्यांची सिंचनाची सोय व्हावी. या करिता पालांदूर, मुरमाडी/तूप., पोहरा परिसरात उपकालव्यांचे(वितरिका) जाळे तयार करण्यात आले. पण कालव्या लगतच्या शेतजमिनीतून पावसाळ्यात पाण्याची निकासी न होता साचून राहिल्याने शेतकऱ्यांची अडचण होते. या शिवाय कालव्यांच्या अरुंद पाळीमुळे जाण्या-येण्याचीही समस्या निर्माण झाली आहे. या बाबद विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता आंबाडी(भंडारा) यांनाही माहिती आहे. पण कसलीही उपाययोजना केली गेली नसल्यामुळे कालव्या लगतच्या शेतशिवारातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.
जिल्ह्यात राष्ट्रीय दर्जाचा इंदिरा सागर(गोसेखुर्द) प्रकल्प असला तरी लगतचा अड्याळ परिसर व लाखनी तालुका सिंचन सोयीपासून वंचित होता. तत्कालीन आमदार सेवक वाघाये व नाना पटोले यांचे प्रयत्नाने नेरला उपसा सिंचन योजनेअंतर्गत नेरला-चिखली-कीटाडी-सेलोटी-धाबेटेकडी-मुरमाडी/तूप-विहिरगाव हा ४५ किलोमीटर चा डावा कालवा तसेच पालांदूर, मुरमाडी/तूप व पोहरा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी. या करिता मचारणा-मेंगापुर, पालांदूर, निमगाव, मुरमाडी-घोडेझरी-खराशी-मरेगाव, मुरमाडी-झरप-विहिरगाव, चिचटोला-मेंढा-गडपेंढरी इत्यादी ३० किलोमीटर चे उपकालवे(वितारिका) तयार करण्यात आल्या. वितारीका बांधकामाचे कंत्राट सत्ताधारी पक्षाचे आमदाराचे नातेवाईकाचे नागपूर येथील एका कन्स्ट्रक्शन कंपनीस देण्यात आले असले तरी टक्केवारीने हे बांधकाम आंध्रप्रदेश च्या एका कंत्राटदाराने केले. यावर तांत्रिक मार्गदर्शन, देखरेख व सनियंत्रणाचे काम उपविभागीय अभियंता मध्यम प्रकल्प उपविभाग पलाडी मुख्यालय आंबाडी चे शाखा अभियंता ज्योतिष पाटील यांचेकडे सोपविण्यात आले होते.
या कन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत पेटी कॉन्ट्रॅक्टर द्वारा कालवा खोदकाम, दोन्ही बाजूची कालव्याची पाळ जाण्या-येण्याचे रस्तासह, आउटलेट, फॉल व पुलिया बांधकाम करण्यात आले. उपकालव्या लगत असलेल्या शेतजमिनीतून पावसाळ्यात पाणी निघत नसल्यामुळे कालव्याचे पाळी खाली नालीही तयार करण्यात आली होती. धरणाचे पाणी वितरिकेतून योग्य रीतीने निकासी होते का ? या बाबद टेस्टिंग करण्यात आली असता अनेक ठिकाणी लिकेज असल्याचे आढळल्याने कालवा पाळीचे माती व मुरुमाचा उपयोग करून लीकेज दुरुस्त करण्यात आल्यामुळे पाळी चे खाली असलेली नाली बुजली तथा कालवा पाळीचे काही ठिकाणाहून पायवाटेत रूपांतर झाल्याने पावसाळ्यात पावसाचे पाणी तथा साहित्याची ने-आण करण्यास अडचण निर्माण होते. या बाबद विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नेरला उपसा सिंचन विभाग आणि कंत्राटदारालाही माहिती आहे. पण उपाययोजनेकडे हेतु पुरस्पर दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होऊन खरीप हंगामात पीक घेण्यास अडचण निर्माण होत असल्यामुळे कालवा बांधकाम झाले पण शेतातील पाणी निकासीची समस्या कायम आहे. म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
प्रतिक्रिया
मी अल्पभूधारक शेतकरी असून माझेकडे एकूण १.०० हेक्टर शेतजमीन आहे. त्यापैकी उपकालव्या(वितरिका) लगत ०.६० आर शेती आहे. त्यात पावसाळ्यात पाणी साचलेले असते त्यामुळे फसल घेतांना अडचणीचे ठरते. याबाबद अनेकदा संबंधित विभागाकडे पत्र व्यवहार केला पण काही उपयोग झाला नाही.
तुषित गजभिये, शेतकरी, खराशी


0 टिप्पण्या